सिंधुुदुर्ग : पालकमंत्र्यांच्या बेपर्वाईमुळे वाळू लिलाव रखडले : राजन दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:58 PM2018-12-11T13:58:34+5:302018-12-11T14:00:18+5:30
पालकमंत्री दीपक केसरकर यांची बेपर्वाई व दुर्लक्ष कारणीभूत असून मनसेचा डंपर व्यावसायिकांच्या आंदोलनास पूर्ण जाहीर पाठींबा राहील, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
सिंधुुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू लिलाव रखडल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे हाल होत असून डंपर व्यावसायिकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. या परिस्थितीस पालकमंत्री दीपक केसरकर यांची बेपर्वाई व दुर्लक्ष कारणीभूत असून मनसेचा डंपर व्यावसायिकांच्या आंदोलनास पूर्ण जाहीर पाठींबा राहील, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
दाभोलकर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महसूल खात्यामार्फत दरवर्षी आॅक्टोबरमध्ये निविदा प्रक्रिया होऊन नोव्हेंबरमध्ये वाळू व्यवसाय सुरू होत होता. परंतु, यावर्षी डिसेंबर महिना सुरू झाला तरी वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे वाळूअभावी हाल झाले आहेत. ६ ते ७ हजारांना मिळणारी वाळू आता १५ ते १६ हजार रुपयांनी खरेदी करावी लागत आहे.
शिवाय चोरटी वाळू वाहतूक होत असल्याने शासनाचा ठेका घेऊन वाळू विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. डंपर व्यावसायिकांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय ठप्प झालेला असल्याने कर्जावर वाहने घेतलेल्या डंपर चालक-मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. भविष्यात काही डंपर मालकांवर वेळेवर कर्जफेड होऊ न शकल्यास आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याला कारणीभूत पालकमंत्रीच आहेत.
आंदोलनाचा इशारा
पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वाळू लिलाव तत्काळ सुरू न केल्यास जिल्ह्यामध्ये मनसेतर्फे जिल्हा आंदोलन उभारण्यात येईल व त्यास पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार राहतील, असेही मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी पत्रकातून जाहीर केले आहे.