सिंधुदुर्ग : 'निपाहच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती, पालिकेने वटवाघळांचा बंदोबस्त करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:49 PM2018-05-31T15:49:10+5:302018-05-31T15:49:10+5:30
निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी : निपाह या साथीच्या रोगाने केरळमध्ये थैमान घातले असताना हा रोग ज्या प्राण्यामुळे मनुष्यात पसरतो, त्या वटवाघळांचा प्रश्न सावंतवाडी-खासकीलवाडा परिसरात निर्माण झाला असून, नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी नाराजी व्यक्त केली असून, या ठिकाणी स्थिरावलेल्या वटवाघळामुळे आजार निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न करीत पालिकेने तत्काळ ठोस पाऊले उचलत या वटवाघळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
येथील खासकीलवाडा भागात राजवाडा परिसराच्या मागे तसेच आरेकर कॉलनी, दीपदर्शन अपार्टमेंट परिसरात तसेच वारंग कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा वावर आहे. दरम्यान त्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
दरम्यान, याबाबत बुधवारी तालुकाध्यक्ष परब यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत पत्रकारांना घटनास्थळी नेऊन माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, माजी नगरसेवक सुदन आरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले. निपाह हा आजार अगदी गोव्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या या वटवाघळांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
सद्यस्थिती लक्षात घेता लहान मुले आंबे, जाम आदी फळे बाहेर पडलेली खातात. त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे होणारे परिणाम लक्षात घेता पालिकेने योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा पक्षाकडून आंदोलन केले जाईल.
दरम्यान, माजी नगरसेवक आरेकर म्हणाले, वटवाघळांचे प्रमाण लक्षात घेता प्रश्न गंभीर आहे. याबाबत योग्य ते आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार आहे. खासकीलवाडा परिसरात स्थिरावलेल्या वटवाघळांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे