सिंधुदुर्ग : सेस वसुलीवरून बांद्यात खडाजंगी, अधिकारी, व्यापारी एकमेकांसमोर भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:43 PM2018-04-10T16:43:38+5:302018-04-10T16:43:38+5:30
बांदा सोमवार आठवडा बाजारात शहरातील काजू व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीच्या गाड्या अडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी बंदुकधारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
बांदा : बांदा सोमवार आठवडा बाजारात शहरातील काजू व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीच्या गाड्या अडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी बंदुकधारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
यावेळी काजू व्यापारी व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे न देताच बाजार समितीचे सचिव डी. एस. परब सहकाऱ्यांसमवेत माघारी परतले.
शेतकऱ्यांना काजू विक्रीचा समाधानकारक दर हा व्यापाऱ्यांमुळेच मिळतो. मात्र, बाजार समितीच्या अन्यायकारक सेस आकारणीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. बाजार समितीने ही अन्यायकारक सेस वसुली थांबवावी. अन्यथा, शेतकऱ्यांकडून काजू खरेदी बंद करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.
व्यापाऱ्यांकडून थेट सेस वसुली करण्याच्या इराद्याने सोमवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव परब, निरीक्षक दत्ताराम मठकर, संजय रावराणे, लिपीक सिध्देश नाईक बांदा बाजारपेठेत दाखल झाले. बाजार समिती ही व्यापारी व काजू कारखानदार या दोघांकडूनही सेसची वसुली करते. ही वसुली अन्यायकारक असल्याचे व्यापारी वळंजू यांनी सांगितले.
बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून सेस न आकारता थेट कारखानदारांकडून आकारावा. तरच व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना काजू खरेदीमागे दोन रूपये ज्यादा दर देणे शक्य होईल असे स्पष्ट केले. मात्र, सेसची आकारणी हा निर्णय आपल्या अखत्यारित नसून हा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळामार्फत घेण्यात येतो असे परब यांनी सांगितले.
बांदा येथील व्यापाऱ्यांनी यावेळी सेस वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, कोणत्याही प्रश्नांना अधिकारी समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. अखेर सेस वसुली न करताच अधिकारी माघारी परतले. यावेळी व्यापारी योगेश काणेकर, भाऊ वळंजू, भैय्या गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश येडवे, संदेश पावसकर, गौरेश गवंडे आदींसह व्यापारी उपस्थित होते.
पोलीस आणल्याने व्यापारी संतप्त
वसुलीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बांदा येथे वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सोबत बंदुकधारी पोलीस आणले होते. त्यामुळेच व्यापारी संतप्त झाले. व्यापाऱ्यांना घाबरविण्यासाठी की आपल्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त आणलात असा सवाल योगेश काणेकर यांनी उपस्थित केला.