सिंधुदुर्ग : बनसोडेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, सहा जणांची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:31 PM2018-06-05T17:31:55+5:302018-06-05T17:31:55+5:30
कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या घरावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून सुमारे साडेपाच लाख रुपये लुटणाऱ्या पुणे येथील सहा जणांच्या टोळीतील फरार असलेल्या पाच आरोपींपैकी अनिल बनसोडे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने बनसोडेलाही लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे.
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या घरावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून सुमारे साडेपाच लाख रुपये लुटणाऱ्या पुणे येथील सहा जणांच्या टोळीतील फरार असलेल्या पाच आरोपींपैकी अनिल बनसोडे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने बनसोडेलाही लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे.
या टोळीला मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमोल दिवाकर राऊत (४३, रा. मालवण) व सचिन नामदेव पाटील (३६, रा. पिंगुळी-कुडाळ) या दोघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी पत्रकारांना दिली.
कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील शेती व्यावसायिक रामदास करंदीकर यांच्या घरावर २२ एप्रिल रोजी ८ वाजता पुणे येथील तोतया आयकर विभागाचा अधिकारी श्रीजीत रमेशन व त्याच्या पाच साथीदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून करंदीकर यांच्या घरातील सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती.
करंदीकर यांच्या तक्रारीनुसार पुणे येथील श्रीजीत रमेशन व त्याचे साथीदार राजबहाद्दूर यादव, अनिल बनसोडे, इरफान व रमेशन याचा अंगरक्षक पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे मोरे व आनंद सदावर्ते या सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते.
गुन्हा दाखल असलेला आनंद सदावर्ते हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर या पुण्याच्या गँगला माहिती देऊन सहकार्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पिंगुळी-गुढीपूर येथील सचिन पाटील व मालवण येथील अमोल राऊत या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील उर्वरित पाच फरार आरोपींना अटक करण्यासाठी तपासकाम सुरू असतानाच फरार आरोपींपैकी बनसोडे याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू नये याकरिता पोलीस प्रशासनाने म्हणणे न्यायालयात मांडले होते.
दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने बनसोडे याचा अर्ज फेटाळला आहे. या दरोड्यातील मुख्य सूत्रधार श्रीजीत रमेशन यानेही जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने रमेशनचाही अर्ज फेटाळला. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यासाठी फरार आरोपी बनसोडे जिल्हा न्यायालयात आला होता का? त्याला अटक केव्हा होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.