सिंधुदुर्ग : आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, जनतेची दिशाभूल : परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:11 PM2018-05-30T17:11:50+5:302018-05-30T17:11:50+5:30
जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.
कणकवली : जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे.
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री फक्त लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले पण जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी काहीही घोषित केले नाही, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील मनसेच्या कार्यालयात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आले. पण जिल्ह्यातील विकासकामांबाबत ते काहीही बोलले नाहीत. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत. वैद्यकीय अधिकारी नाहीत. मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हिताचा काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्य पुरेसे नाही.
जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्ता डांबरीकरणाची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऊर्जामंत्र्यांनी जनतेची उपेक्षा केलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ.
दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांचे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
आरोग्याबाबत फक्त घोषणा होतात. परंतु कृती होत नाही. आदिवासी जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणाकडे जनतेचे बारीक लक्ष आहे.
कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. ही जनतेची दिशाभूल आहे. शिवसेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करू नये, जनतेला आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपने जनतेला सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना-भाजपावाले निवडणुकीपुरते एकत्र येतात. कधी भांडतात पुन्हा एक होतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांना युती नको होती. तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी युती केली आणि आता शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनने पालघरमधील निवडणुकीत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. भाजप निवडणुका कशा जिंकते याची पोलखोल पालघरमधील निवडणुकीत दिसून आली.
- परशुराम उपरकर