सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे : बबन साळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:01 PM2018-03-30T15:01:26+5:302018-03-30T15:01:26+5:30
दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले या भागांसाठी सावंतवाडी या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करण्यात यावे. त्यासाठी मंजूर झालेले शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे वीस कोटी रुपये खर्च करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले या भागांसाठी सावंतवाडी या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करण्यात यावे. त्यासाठी मंजूर झालेले शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे वीस कोटी रुपये खर्च करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तीनही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तशाप्रकारचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या पालिकेच्या मासिक बैठकीत याबाबतचा ठराव साळगावकर यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
साळगावकर म्हणाले, गोवा-बांबोळीत उपचार बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोवा-बांबोळीत उपचार पुन्हा नि:शुल्क सुरू करण्यात यावेत, ही मागणी योग्य आहे. पण आम्ही आता किती दिवस अन्य राज्यांवर अवलंबून रहावे हा सुध्दा मुद्दा महत्त्वाचा आहे.
शासनाकडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जाहीर करण्यात आलेला वीस कोटी रुपयांचा निधी लक्षात घेता आणखी दहा कोटी रुपये वाढवून देण्यात यावेत आणि सावंतवाडीत नव्याने पाचशे बेड क्षमता आणि शंभर विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे. तात्पुरत्या स्वरुपात येथील कुटीर रुग्णालयाला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा. त्याचा फायदा सावंतवाडीसह वेंगुर्ले आणि दोडामार्ग भागातील लोकांना होणार आहे.
साळगावकर पुढे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कणकवली, कुडाळ, मालवण या भागांसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
या तीन तालुक्यातील रुग्णांना एकाच छताखाली हृदयविकारासारखे सर्व तज्ज्ञ डॉक्टर, ट्रामाकेअर सेंटर आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत. याठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे यासाठी आवश्यक असलेले ठराव तीनही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी व पंचायत समिती स्तरावर घेण्यात यावेत, असे आवाहन साळगावकर यांनी केले.
मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता
लोकांवरील अन्यायाविरोधात झटणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्यामुळे कोठे अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरण्यास मी कसलाही राजकीय फायदा बघत नाही किंवा कमीपणा घेत नाही. मी आजवर पदासाठी राजकारणात आलो नाही. पदे मला नशिबाने मिळत गेली. कोणाच्या टीकेचा मी विचार करीत नाही.
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष, सावंतवाडी