सिंधुदुर्ग : भालचंद्र दळवी यांचे पुन्हा उपोषण, जानवली रामेश्वरनगर येथील अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 04:01 PM2018-10-11T16:01:12+5:302018-10-11T16:05:28+5:30
कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भालचंद्र दळवी यांनी उपोषण सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बोलविले नाही. त्यामुळे या चौकशीला काही अर्थ नाही.
चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगत अनधिकृत बांधकामावर तसेच हे अनधिकृत बांधकाम करण्यास मदत करणाऱ्या मंडळ अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कणकवलीचे शिवसेना उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी यांनी पुन्हा जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले आहे.
जानवली रामेश्वरनगर येथे तेथील जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आहे. त्याचप्रमाणे इमारत बांधकाम सुरू असलेली जमीन संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी तत्कालीन मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून फेरफार करून हडप केली आहे.
या इमारतीचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. असे असतानाही जानवली ग्रामसेवकाला हाताशी धरून इमारतीचे असेसमेंट करून घेतले आहे. त्यामुळे जानवली रामेश्वरनगर येथे सुरू असलेले बांधकाम हे अनधिकृत आहे.
याशिवाय अनधिकृत जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी काही व्यक्तींकडून कराराने लाखो रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे रेरा कायद्याचा भंग करून शासनाचा महसूलही बुडविला आहे असा आरोपही दळवी यांनी केला आहे.
कारवाई करण्यात यावी
याबाबत आपण कणकवली गटविकास अधिकाऱ्याकडे ११ जून २०१८ रोजी तक्रार दिली होती. मात्र, राजकीय दबाव असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही दळवी यांनी केला आहे. तक्रार देऊनही अद्याप काही न झाल्याने अनधिकृत इमारतीसह संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.