सिंधुदुर्ग : अर्धनग्न महिलेचा मृतदेह सापडला, मालवण येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:33 PM2018-07-16T13:33:19+5:302018-07-16T13:37:26+5:30
मालवण बंदरजेटी परिसरातील समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला अर्धनग्न स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता.
मालवण : मालवण बंदरजेटी परिसरातील समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला अर्धनग्न स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता.
मालवण बंदरजेटी परिसरात सुमारे ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत समुद्रात तरंगताना स्थानिक मच्छिमार व नागरिकांना दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन समुद्रात तरंगणाऱ्या महिलेला किनारी आणले. याबाबतची माहिती पोलीस पाटील रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, हवालदार निलेश सोनावणे, संतोष गलोले, गंगा येडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
मालवण समुद्रकिनारी सकाळी आढळून आलेल्या महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह तरंगताना दिसून आला. या महिलेच्या डोळ्यावरही रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून येत होत्या. हीमहिला ३५ ते ४० वयोगटातील असून तिचा वर्ण गोरा आहे. तिच्या अंगावरील उपलब्ध कपड्यांवरून तिने पंजाबी ड्रेस परिधान केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तर्कवितर्कांना ऊत; पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जखमी व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची बातमी पसरताच बंदरजेटी किनारी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या महिलेच्या अंगावर अर्धे कपडेच असल्याने तसेच चेहऱ्यांवर रक्ताच्या खुणा दिसून आल्याने बघ्यांनी घातपाताचीही शक्यता वर्तवली. तर काहींनी नैराश्यातून त्या अज्ञात महिलेने आत्महत्या केली असावी, असेही तर्क लढविले होते. याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली होती.
महिला अनोळखी असल्याने ती पर्यटक किंवा बाहेरगावची असू शकते, असा अंदाज पोलिसांचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी अन्य पोलीस ठाण्यातून कोणी बेपत्ता आहे का? याबाबत माहिती घेतली. सोशल मीडियावर अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असल्याबाबत पोस्ट टाकून ती महिला पर्यटक असल्यास कोणाच्या हॉटेल, लॉजवरून बेपत्ता झाली असल्यास मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेहाची ओळख पटली नव्हती.