सिंधुदुर्ग : सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला, बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:32 PM2018-06-28T16:32:30+5:302018-06-28T16:34:59+5:30
गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले महावितरण कंपनीचे वालावल विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (३५, मूळ रा. गांधीनगर-अक्कलकोट) यांचा मृतदेह बुधवारी मालवण तालुक्यातील काळसे येथील नदीपात्रात आढळून आला. पिंपळे यांनी आत्महत्या केली की त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नाही.
सिंधुदुर्ग : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले महावितरण कंपनीचे वालावल विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (३५, मूळ रा. गांधीनगर-अक्कलकोट) यांचा मृतदेह बुधवारी मालवण तालुक्यातील काळसे येथील नदीपात्रात आढळून आला. पिंपळे यांनी आत्महत्या केली की त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नाही.
युवराज पिंपळे महावितरण कंपनीच्या वालावल विभागात कार्यरत होते. २२ जून रोजी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते बेपत्ता होते. गांधीनगर-अक्कलकोट येथील पिंपळे नोकरीनिमित्त कुडाळ येथील माटेवाडा भागात राहत होते. गुरूवारी रात्री घरगुती कारणावरून वाद झाला होते. त्यानंतर ते रोजच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांची पत्नी वैशाली त्यांना उठविण्यासाठी गेली असता ते खोलीत नव्हते.
त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध करण्यात आली होती. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे बेपत्ताची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, अशी माहिती त्यांची पत्नी वैशाली हिने दिली.
या दरम्यान बुधवारी नेरूरपार येथील नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना तेथील ग्रामस्थांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देताच मालवण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अधिक तपास केला असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या पिंपळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रोज मॉर्निंग वॉक
पिंपळे हे रोज पहाटे मार्निंग वॉकला जात होते. कुडाळ भंगसाळ नदीकिनाऱ्यावरून जाताना त्यांचा पाय घसरून नदीपात्रात बुडून मृत्य झाला की, त्यांनी आत्महत्या केली, हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.