सिंधुदुर्ग : चौकुळ येथे घराची तोडफोड, अज्ञाताकडून कृत्य : वार्षिक जत्रोत्सवावेळी प्रकार, दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 05:11 PM2017-12-23T17:11:31+5:302017-12-23T17:15:05+5:30
चौकुळ येथे सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे यांच्या ग्रामीण पर्यटन या संकल्पनेसाठी बांधण्यात आलेल्या घराची अज्ञाताकडून घरातील फरशीसह सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जत्रोत्सवाच्या रात्री ही घटना घडली. यात अरुण गावडे यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान करण्यात आले.
आंबोली : चौकुळ येथे सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे यांच्या ग्रामीण पर्यटन या संकल्पनेसाठी बांधण्यात आलेल्या घराची अज्ञाताकडून घरातील फरशीसह सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जत्रोत्सवाच्या रात्री ही घटना घडली. यात अरुण गावडे यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान करण्यात आले.
सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे येथे ग्रामीण पर्यटन रुजवून नवी गाववाले बहुउद्देशीय पर्यटन संस्था, आंबोली-चौकुळ व गेळे या संस्थेद्वारे प्रयत्न करत आहेत. त्यांनी ग्रामीण पर्यटनसाठी, पर्यटकांसाठी निवासस्थान करण्यासाठी आपल्या जागेत नेनेवाडी येथे सर्व्हे क्रमांक ७४ येथे घर बांधले होते. त्याची डागडुजी करुन येत्या २ दिवसांत पर्यटकांसाठी ते घर खुले करणार होते.
मात्र, जत्रोत्सवाचा फायदा घेत अज्ञाताने बुधवारी रात्री तेथे कोणीही नसल्याची संधी साधत दरवाजा तोडून आतील ठेवण्यात आलेल्या सामानासोबत घरातील सर्व खोल्यातील व बाथरूमसहीत बसवलेल्या फरशीचे अक्षरश: तुकडे-तुकडे केले. हे करताना ती अज्ञात व्यक्ती जखमी ही झाली असल्याची शक्यता असून तेथे घरात रक्ताचे सर्वत्र डाग पसरले आहेत.
या घटनेची माहिती गुरूवारी सकाळी घरी आल्यावर अरुण गावडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लागलीच आंबोली पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास सावंत व कॉन्स्टेबल गुरुदास तेली यांनी पाहणी केली.
यावेळी अरुण गावडे यांनी घरातील बसवलेली किमती फरशी, शिल्लक असलेले १५ बॉक्स फरशी, बेसीन, पाईप लाईन यांची तोडफोड तर आतील कामगारांचे दोन कटर मशीन, ग्राइंडर, सौर उर्जा संच, पेट्रोल जनरेटर आदी सामानाची तोडफोड झाल्याची तक्रार दिली आहे.
दोन-तीन वर्षापूर्वीही तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी एका संशयीताबद्दल तक्रार दिली होती. असा संशय अरुण गावडे यांनी व्यक्त केला आहे. तर तोडफोड झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी पाहणी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
घरातील फरशीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.