सिंधुदुर्ग : भावासह पुतण्याला बांबूच्या दांड्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:08 PM2018-09-10T18:08:58+5:302018-09-10T18:10:48+5:30
घराच्या पडवीत मुलासमवेत नारळ सोलत बसलेल्या उत्तम यशवंत पाटील (६२) आणि पुतण्या स्वप्नील उत्तम पाटील या दोघांना संतोष यशवंत पाटील याने बांबूच्या दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत उत्तम पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मालवण : घराच्या पडवीत मुलासमवेत नारळ सोलत बसलेल्या उत्तम यशवंत पाटील (६२) आणि पुतण्या स्वप्नील उत्तम पाटील या दोघांना संतोष यशवंत पाटील याने बांबूच्या दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत उत्तम पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संतोष हा उत्तम पाटील यांचा लहान भाऊ आहे. ही मारहाण शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाली.
मसुरे पोलीस दूरक्षेत्राकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उत्तम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण व मुलगा दोघेही घराशेजारी असलेल्या ब्राह्मण देवस्थानाच्या ठिकाणी ब्राम्हण भोजन करण्यासाठी माडाच्या बागेतून नारळ काढून घरी आणले होते.
घराच्या पुढच्या पडवीत बसून नारळ सोलत असताना लहान भाऊ संतोष हा त्याठिकाणी आला व काहीही कारण नसताना त्याने शिवीगाळ करत तू नारळ कशाला सोलतोस? असे बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. घराच्या बाहेर असलेला बांबूचा दांडा घेऊन माझ्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केली.
मी व माझा मुलगा घाबरून पळून जात असताना संतोष याने पाठलाग करून स्वप्नील याच्या पाठीवर मारहाण केली. तसेच संतोष याने मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत मला गंभीर दुखापत झाली, असेही म्हटले आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
संतोष याने तू व तुझा मुलगा घरात आल्यास तुम्हांला ठार मारून टाकीन अशी धमकीही यावेळी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे संतोष नांदोसकर हे करीत आहेत.