सिंधुदुर्ग : तळगावात स्वाभिमानचे फलक फाडले, अज्ञाताचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:02 PM2018-07-21T17:02:14+5:302018-07-21T17:07:54+5:30
मालवण तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे.
मालवण : तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल स्वाभिमानचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे.
याबाबत ग्रामस्थांसह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या गावात राणे यांनी पूल मंजूर केल्याने सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, तळगाव हा खासदार विनायक राऊत यांचा गाव असून आमदार वैभव नाईक यांनी हा गाव दत्तक घेतला आहे. मात्र, सत्ताधारी गावात विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे काही समाजकंठकांकडून समाज हिताच्या आड येत बॅनर फाडल्याची विकृती समोर आली आहे. अशा वृत्तीचा तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी निषेध केला.
|
तळगाव येथे शुक्रवारी तालुकाध्यक्ष मंदार केणी, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, नगरसेवक यतीन खोत यांनी तळगाव गावास भेट देऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.
तळगाव येथे स्वाभिमान कार्यकर्त्यांनी लावलेले आभाराचे फलक अज्ञातांनी फाडले.
यावेळी ग्रामस्थ नरेंद्र पावसकर, महेश परब, संदीप दळवी, जगदीश चव्हाण, सुभाष सावंत, अर्जुन माळगावकर, सागर गावडे, नामदेव दळवी, दत्तू सावंत, जनार्दन तळगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वराड व तळगाव या मार्गावर कर्ली खाडी असल्याने या मार्गावर पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांची होती. सद्यस्थितीत या मार्गावर लोखंडी साकव असल्याने कोणतेही वाहन यावरून जात नव्हते. शिवाय गावातील ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती.
आजारी माणसांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे पूल उभारण्याबाबत पाठपुरावा सुरु केला. राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्याकडे नवीन पुलासाठी निधीची मागणी केली होती.
नव्या प्रशस्त पुलासाठी नाबार्ड योजनेतून १ कोटी वीस लाख मंजूर करण्यात आले आहेत. या पुलामुळे वराड तळगाव या गावांना जोडणारा आठ ते दहा किमी लागणारा फेरा वाचणार आहे, असे संतोष साटविलकर यांनी सांगितले.
मात्र आपल्या गावासाठी नवा पूल प्रस्तावित झाल्याने स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या ठिकाणी खासदार राणे यांच्या आभाराचे फलक लावले. त्यानंतर काही समाजकंटकांकडून हे फलक फाडण्यात आले.
तळगाव गाव खासदार राऊत यांचा असल्याने फलक फाडल्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण ढवळू शकते. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आली नसली तरी स्वाभिमानकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
गावात सुडाचे राजकारण : मंदार केणी
खासदार विनायक राऊत आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विकास कामात अपयशी ठरले आहेत. आपल्या गावातील पूल उभारणी करणेही त्यांना शक्य नसल्याने ग्रामस्थांनी नारायण राणे यांना हाक दिली. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पूल उभारणीसाठी निधी मंजूर करून घेतला. त्याप्रमाणे गावात फलक लावण्यात आले. फलक फाडण्याचे केलेले कृत्य पाहता गावात सुडाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला.