सिंधुदुर्ग : वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर : दीक्षितकुमार गेडाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:07 PM2018-04-24T16:07:16+5:302018-04-24T16:07:16+5:30

यापुढे वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओ विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची (सीसीटीव्हीची) नजर राहणार आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करताना दिला.

Sindhudurg: CCTV footage of fast trackers: Dikshitkumar Gedam | सिंधुदुर्ग : वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर : दीक्षितकुमार गेडाम 

सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित २९ व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर : दीक्षितकुमार गेडाम  रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ; वाहनचालकाने नियमांचे पालन करावे

सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे असे आवाहन करतानाच यापुढे वेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओ विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची (सीसीटीव्हीची) नजर राहणार आहे.

वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करताना दिला.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित २९ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१८ चा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य नागेश ओरोसकर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक, वाहन चालक नागरिक आदी उपस्थित होते.

राज्यातील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने रस्ता सुरक्षेची मोहीम हाती घेतली आहे. येत्या सोमवारपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत २३ ते ३० एप्रिल या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.

यावेळी दीक्षितकुमार गेडाम  म्हणाले की, जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविले जात असल्याने रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ८१ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. तर २०१७-१८ मध्ये ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

हे अभियान यशस्वीरित्या राबविले जात असले तरी जोपर्यंत वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार नाही, तोपर्यंत रस्ते अपघात रोखणे अवघड आहे. मात्र, आता बेदरकारपणे वाहन चालवणारे, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता आरटीओ विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.

अर्थातच संबधितांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा गेडाम यांनी यावेळी दिला. तसेच अपघात समयी नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन केले.

जिल्ह्यात दिवसेंदिवस रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा फार महत्त्वाची आहे. प्रत्येकाने जबाबदारी व नियमांचे काटेकोर पालन करून वाहन चालवावे. वेगावर नियंत्रण ठेवून स्वत: बरोबरच इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियान कालावधीत वाहनचालकांची नेत्र तपासणी, बल्ड प्रेशर, मधुमेह तपासणी केली जाणार आहे. तसेच युवा वर्गामध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे आरटीओ अशोक शिंदे यांनी सांगितले. आरटीओ विभागामार्फत वाहतूक नियमांची माहिती असलेली सारथी पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

अनेक वेळा एकच वाहनचालक वारंवार वाहतूक नियम मोडतो. मात्र त्याची माहिती मिळत नव्हती आता मात्र ई आॅफिस झाल्याने कोणत्या वाहनचालकाने किती वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे जे वाहन चालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांनी यावेळी सांगितले.

शहरी भागांमध्ये रोडरोमिओंचा त्रास वाढत चालला आहे. त्यांच्यावरही विशेष लक्ष असणार असून आवश्यक भासल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

१८ वर्षाखालील मुले वाहन चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखून लहान मुलांकडे वाहन देवू नये असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

रस्ता सुरक्षा अभियान लकी ड्रॉचे ५ जण मानकरी

२९ व्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आरटीओ विभागामार्फत लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यात शुभारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या वाहन चालकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ चे ५ जण मानकरी ठरले आहेत. यात चेतन (दोडामार्ग), अकबर शेख (सुकळवाड), जयेश राजीवडेकर (सावरवाडी), शाहिद धोपावकर (विजयदुर्ग), संजय नार्वेकर (मालवण) यांना लकी ड्रॉ मध्ये हेल्मेट देण्यात आले.
 

Web Title: Sindhudurg: CCTV footage of fast trackers: Dikshitkumar Gedam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.