सिंधुदुर्ग : पिस्तूल रोखत तरुणावर चाकूहल्ला, वायरी येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 05:51 PM2018-07-10T17:51:03+5:302018-07-10T17:52:33+5:30
जमीन खरेदीतील धमकीच्या वादातून मालवण तालुक्यातील वायरी गावकरवाडा येथील दिनेश दत्ताराम साळकर (३५, रा. हडी-साळकरवाडी) या तरुणाला दांडी येथील राजेश खडपे, शुभम संतोष जुवाटकर व अन्य एका संशयिताने पिस्तूल रोखत चाकूहल्ला केला.
सिंधुदुर्ग : जमीन खरेदीतील धमकीच्या वादातून मालवण तालुक्यातील वायरी गावकरवाडा येथील दिनेश दत्ताराम साळकर (३५, रा. हडी-साळकरवाडी) या तरुणाला दांडी येथील राजेश खडपे, शुभम संतोष जुवाटकर व अन्य एका संशयिताने पिस्तूल रोखत चाकूहल्ला केला. याप्रकरणी साळकर याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. हा प्रकार वायरी गावकरवाडा येथील हडकर बियरशॉपी येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला.
वायरी गावकरवाडा येथे दिनेश साळकर हा तरुण राहतो. त्याची कोल्हापूर जिल्ह्यातील वतार-हातकणंगले या गावी स्वमालकीची एक एकर जमीन आहे. ती जमीन तानाजी भंडारी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये विकत घेतली. या जमीन व्यवहारातील उर्वरित दोन लाख रक्कम मिळविण्यासाठी साळकर याने महिन्याभरापूर्वी राजेश खडपे याला वसुली करण्यास सांगितले. राजेश याने शुभम जुवाटकर याच्यावर जबाबदारी दिली होती.
दिनेश साळकर याला राजेशने रविवारी ८.३० वाजता फोन करून मालवण तालुक्यातील वायरी येथील हडकर बियर शॉपीत बोलावून घेतले. त्यानंतर राजेश, शुभम व राजेशचा भाऊ मद्य प्राशन करीत बसले.
त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता शुभम याने आपल्याकडील पिस्तूल दिनेश याच्या डोक्यावर रोखून धरले व जमीन व्यवहारातील धमकीच्या बदल्यातील पैसे दे, नाहीतर ठार मारून टाकेन अशी धमकी देत डाव्या हाताने तेथीलच बियरची बाटली फोडून कानशिलात लगावत दुखापत केली. त्यानंतर दिनेश हा स्वत:ला वाचविण्यासाठी पळत असताना शुभम याने चाकूने हल्ला करीत उजव्या खांद्याला दुखापत केल्याचे साळकर याने तक्रारीत म्हटले आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
साळकर याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी संशयित राजेश खडपे, शुभम जुवाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. तर अन्य एका संशयिताला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश सोनावणे, संतोष गलोले हे करीत आहेत.