सिंधुदुर्ग : कणकवली नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत, नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:31 PM2018-03-27T16:31:34+5:302018-03-27T16:31:34+5:30
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अभय राणे व अजित राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी राजश्री धुमाळे यांच्यासह ७ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या ९ झाली आहे.
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अभय राणे व अजित राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी राजश्री धुमाळे यांच्यासह ७ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या ९ झाली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना- भाजप युतीकडून संदेश पारकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून समीर नलावडे, काँग्रेसच्यावतीने विलास कोरगावकर तर स्वतंत्रपणे लढणाऱ्या कणकवली विकास आघाडीच्यावतीने राकेश राणे यांच्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे.
तर नगरसेवक पदासाठी ५ ठिकाणी चौरंगी व ७ ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. २ ठिकाणी पंचरंगी तसेच २ ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १० मध्ये तीन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
मात्र, या प्रभागातील भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शीतल रामदास मांजरेकर व काँग्रेसच्यावतीने अर्ज दाखल केलेल्या स्वाती अजित काणेकर यांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने अवैध ठरविण्यात आले होते. त्या दोघांनी न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील दाखल केले आहे. त्यामुळे या प्रभाग १० चा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत लढती निश्चित झाल्याने आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे.
नगरसेवक पदासाठी ५५ उमेदवार रिंगणात
कणकवली नगरपंचायत निवडणुकीअंतर्गत नगरसेवक पदासाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग १० मधील ३ अर्ज वैध ठरले असले तरी २ अवैध ठरलेल्या अर्जांच्या अपिलावर सुनावणी होऊन निर्णय झाल्यानंतर या प्रभागातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे.