सिंधुदुर्ग : शेवरे, पवार यांचे साहित्य नवीन साहित्यिकांना प्रेरणा देणारे : प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:21 PM2018-04-24T16:21:52+5:302018-04-24T16:21:52+5:30
आजच्या तरूण नव साहित्यिकांना शेवरे व पवार यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ््यात कणकवली नगरवाचनालयात आयोजित कार्यक्रमात काढले.
खारेपाटण : आजच्या तरूण नव साहित्यिकांना शेवरे व पवार यांचे साहित्य प्रेरणा देणारे आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ््यात कणकवली नगरवाचनालयात आयोजित कार्यक्रमात काढले.
पारंपरिक भाषेतील शब्दांना छेद देऊन आपण आपले नवीन साहित्यिक शब्द तयार केले पाहिजेत. भारताचा इतिहास हा सुमारे ८००० वर्षांपूर्वीचा असून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची वेळ आता आली आहे. आपल्या समाजातील साहित्यिकांनी, संशोधकांनी व रसिकांनी पुढे येऊन तो नव्याने लिहिला पाहिजे. सिंधुदुर्गसारख्या निसर्गरम्य जिल्ह्यात येथील उपेक्षित समाजात आ. सो. शेवरे, उत्तम पवार यांसारखे साहित्यिक निर्माण झाले तो समाज कधीच मागे राहणार नाही.
सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील नामवंत दिवंगत ज्येष्ठ दलित साहित्यिक व विद्रोही कवी आ. सो. शेवरे तसेच तरुणांना प्रेरणा देणारे आंबेडकर चळवळीतील तरूण कवी उत्तम पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आ. सो. शेवरे जीवनगौरव व उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्याचे घोषित केले होते.
कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त राजा ढाले, सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार विजेते कवी अरूण इंगवले, डॉ. सोमनाथ कदम, कवयित्री संध्या तांबे, डॉ. श्रीधर पवार, सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कवयित्री संध्या तांबे यांनी आ. सो. शेवरे यांच्या जीवन कार्याबाबत भाष्य करणारा आढावा घेतला. तर सोमनाथ कदम यांनी आपल्या मनोगतात कवी उत्तम पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. कवी इंगवले यांनीही आपले विचार मांडले. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गच्यावतीने यावेळी पुरस्कार वितरण सोहळ््याला विशेष उपस्थित असलेल्या कवी आ. सो. शेवरे यांच्या पत्नी मायावती शेवरे तसेच कवी उत्तम पवार यांच्या पत्नी निलम पवार यांचा प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ््याला रत्नागिरी व सिंधुदुर्गातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रास्ताविक सिद्धार्थ तांबे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख अनिल कदम यांनी करून दिली. यावेळी डॉ. श्रीधर पवार, सुनील हेतकर यांनी आपले विचार मांडले.
पौराणिक साहित्य जतन होणे गरजेचे !
आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार विजेते व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा ढाले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्याच्यामध्ये धैर्य नाही तो कधीही कार्यकर्ता होऊ शकत नाही. आंबेडकरी चळवळ टिकवून ठेवण्याचे काम आम्ही केले. याचबरोबर या चळवळीतून साहित्यिकांची फळी निर्माण करण्याचे कार्यदेखील केले. आंबेडकर चळवळीचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यासाठी आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे.
आपले साहित्य नुकत्याच गोष्टी सांगणारे असू नये. तर ते विचार करायला लावणारे असावे. एकांगी इतिहास मांडणारी प्रवृत्ती मोडून काढली पाहिजे व लढाऊ प्रवृत्तीच्या माणसांनी आपली मानसिकता ओळखून गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे. आपल्या लोकशाही देशात आजही आदिवासी लोकांना अंगभर कपडे नाहीत. लोकशाहीला हे फार घातक आहे. तसेच पौराणिक साहित्यांचे जतन होणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.