सिंधुदुर्ग : चोरट्याने मारला ३० तोळ्यांच्या सोन्यावर डल्ला, खैदा-कातवड येथे बंद घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:50 PM2018-10-27T17:50:30+5:302018-10-27T17:52:43+5:30
कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील घरफोडीची घटना ताजी असताना मालवण तालुक्यातील खैदा-कातवड गावात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील घरफोडीची घटना ताजी असताना मालवण तालुक्यातील खैदा-कातवड गावात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घरफोडीत अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेल्या सुमारे ९ लाख रुपयांच्या तीस तोळांच्या सोन्यावर डल्ला मारत तीन हजारांची रोख रक्कमही लंपास केली. याबाबत प्रतिभा पद्माकर ढोलम यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैदा कातवड येथे प्रतिभा ढोलम यांचे घर आहे. त्यांचा मुलगा प्रवीण हा महावितरण कंपनीत कराड येथे कामाला आहे. प्रतिभा या मालवणात आपल्या दोन नातवंडासह भाड्याने वास्तव्यास राहतात. त्यांचा मुलगा प्रवीण हा दसऱ्याच्या निमित्ताने खैदा-कातवड येथील मूळ घरी आला होता. त्यावेळी त्याने घरात सोन्याचे दागिने ठेवले होते.
त्यानंतर तो पुन्हा कामासाठी कराड येथे गेला होता. तेव्हापासून ढोलम यांचे घर बंद होते. शुक्रवारी रात्री प्रवीण हा मालवण येथे आला. त्यानंतर शनिवारी सकाळी तो खैदा-कातवड येथील मूळ घरी परतला असता त्याला घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले.
प्रवीण याने घरात प्रवेश करत पाहिले असता कपाट फोडल्याचे तसेच आतील सोन्याचे दागिने तसेच कोटमध्ये ठेवलेले रोख तीन हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली.
ढोलम यांनी कपाटात ठेवलेले पाच सोनसाखळ्या, एक हार, दोन बांगड्या, एक अंगठी असे सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने तसेच कोटासह आतील तीन हजार रुपये असा सुमारे ९ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी प्रतिभा ढोलम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रतिभा ढोलम यांचे घर.
पोलीस घटनास्थळी ; ठसे तज्ज्ञांना पाचारण
खैदा-कातवड परिसरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार सुनील वेंगुर्लेकर, पोलीस नाईक संतोष गलोले, योगेश जळवी, सिद्धेश चिपकर,अविनाश गायतोंडे, उज्ज्वला मांजरेकर, फ्रीडन भुतेलो आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी आय-बाईक पथकही दाखल झाले होते. तसेच ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी माहितगाराने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांसाठी चोरट्याचा माग घेणे आव्हानच बनले आहे.