सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्ह्यात पाणी होतेय दूषित, आरोग्य विभागाचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:52 PM2018-05-11T12:52:00+5:302018-05-11T12:52:00+5:30
स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
एप्रिल अखेर तपासण्यात आलेल्या १३८० पाणी नमुन्यांपैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात ग्रामीण भागात १०.५४ टक्के तर शहरी भागात ४.४ टक्के दूषित पाणी आहे. ही टक्केवारी पाहता पाणी शुद्धिकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला फार महत्त्व आहे. त्यामुळेच जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पाणी नमुने दरमहा तपासले जातात. त्यात दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांच्या स्रोतांचे शुद्धिकरण केले जाते.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १३८० पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात वैभववाडी तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे.
या पाणी नमुन्यांच्या आकडेवारीवरून स्वच्छ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी दूषित होत चालले असल्याचे स्पष्ट होत आहे. यात तब्बल १०.५४ टक्के ग्रामीण भागात तर ४.४ टक्के शहरी भागात दूषित पाणी आहे. मात्र संबंधित पाणी स्रोतांचे शुद्धिकरण करण्यात आले आहे. एकंदरीत दूषित पाण्याची आकडेवारीही स्वच्छ सिंधुदुर्गला शोभनिय नाही.
टीसीएलऐवजी अन्य यंत्रणेचा शुद्धिकरणासाठी वापर व्हावा
मे महिना चालू असतानाच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. तसेच पाणी साठेही आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत पाण्यात टीसीएल पावडर टाकल्यास आतील जलचर प्राणी मृत होण्याची शक्यता आहे. जलचर प्राणी पाण्यात मृत झाल्यास उपलब्ध पाणीसाठाही पिण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत टीसीएल पावडरऐवजी अन्य पाणी शुद्धिकरण यंत्रणेचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र तशी यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध नाही.
दूषित पाण्याचा अहवाल
दोडामार्ग - १२३ पाणी नमुने, ८ दूषित.
सावंतवाडी - २३३ पाणी नमुने, १२ दूषित.
वेंगुर्ला - १२३ पाणी नमुने, १२ दूषित.
कुडाळ- १८९ पाणी नमुने, ८ दूषित.
मालवण - १७१ पाणी नमुने, ११ दूषित.
कणकवली - २६९ पाणी नमुने, ३९ दूषित.
देवगड - २४७ पाणी नमुने, ४२ दूषित.
वैभववाडी - २५ पाणी नमुने, ७ दूषित.
एकूण - १३८० नमुने, १३९ दूषित.