सिंधुदुर्ग : कोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी, वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:24 PM2018-06-28T16:24:47+5:302018-06-28T16:28:19+5:30
कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या अज्ञात चोरट्यांना या चोरीत कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सध्या घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत.
तळेरे : कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या अज्ञात चोरट्यांना या चोरीत कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सध्या घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत.
मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कोळोशी वरचीवाडी येथील उपेंद्र राणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. तसेच घरातील कपाट फोडत त्यातील काही मुद्देमाल हाती मिळेल या आशेने यातील सामान विस्कटून टाकले.
चोरट्यांनी घरातील इतर वस्तूही विस्कटून टाकल्या. मात्र, अज्ञात चोरट्यांना या चोरीत काहीही मुद्देमाल हाती मिळाला नाही. बुधवारी सकाळी ही गोष्ट लक्षात आल्यावर पोलीस पाटील संजय गोरुले यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांसोबत पाहणी केली व ही माहिती कासार्डे दूरक्षेत्राला दिली.
याबाबत अधिक तपास कासार्डे पोलीस करीत आहेत. काही दिवसांपूर्वी याच घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. यामुळे काही दिवस थांबलेले चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले की काय? अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.