सिंधुदुर्ग : कंपनीने वर्षभर दिले नाही मानधन, ग्रामपंचायतीचे काम न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:30 PM2018-03-31T16:30:50+5:302018-03-31T16:30:50+5:30
वर्षभर मानधन न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १७ केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. तसेच सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांनी कैफियत मांडली. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
वैभववाडी : वर्षभर मानधन न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १७ केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. तसेच सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांनी कैफियत मांडली. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राजीनामा देताना वर्षभराचे थकित मानधन एकरकमी मिळाल्याशिवाय यापुढे ग्रामपंचायतीचे कोणतेही काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी तालुका समन्वयक, सभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. एप्रिल २०१७ पासून आजमितीस केंद्रचालकांनी नियमित काम केले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून सर्व केंद्रचालकांना मानधन देण्यात आलेले नाही.
याबाबत त्यांनी सी.एस.सी.एस.पी.व्ही. कंपनी आणि प्रशासनाकडे सतत मागणी केली. परंतु, कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आंबेडकर भवनात सभा घेऊन अखेर गुरुवारी सर्व केंद्रचालकांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
या सभेतच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तालुका समन्वयक पाटील यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले. त्यानंतर सर्वांनी वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे आणि गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांची भेट घेऊन कैफियत मांडली. जोपर्यंत एक वर्षाचे संपूर्ण मानधन दिले जात नाही; तोपर्यंत काम न करण्याचा निर्णय केंद्रचालकांनी घेतला आहे.
यावेळी स्नेहा वायंगणकर, दीपश्री अटेकेकर, प्रसिद्धी पवार, श्रद्धा सांवत, रुपाली रावराणे, उदय फोंडके, जयराज हरयाण, रुपेश कांबळे, महेश दळवी, तुषार हडशी, हेमंत साळुंखे, विधी नारकर, अक्षय कांबळे, प्रशांत पांचाळ, महेश पाटील, राजेंद्र कदम, विशाल जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे थकित मानधनासाठी सामूहिक राजीनामे सुपुर्द केले.