सिंधुदुर्ग : दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना घेराओ, लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:47 PM2018-03-17T14:47:45+5:302018-03-17T14:47:45+5:30
कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशीत सध्या दूरसंचार सेवेचा खेळखंडोबा सुरु असून गेले तीन, चार महिने येथील समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यावर दूरसंचारचे अधिकारी खारेपाटण येथे दाखल झाले व लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेत असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशीत सध्या दूरसंचार सेवेचा खेळखंडोबा सुरु असून गेले तीन, चार महिने येथील समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यावर दूरसंचारचे अधिकारी खारेपाटण येथे दाखल झाले व लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेत असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.
खारेपाटण येथील दूरसंचारच्या सेवेने व्यापारी, बँका, शाळा व इतर शासकीय कार्यालयांना परिणाम भोगावा लागत असून त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. याबाबत दूरसंचारच्या अधिकऱ्यांना लेखी पत्र देऊन आंदोलनाबाबत माहिती दिली होती.
या पार्श्वभूमीवर दूरसंचारच्यावतीने उपमंडल अधिकारी एस.एल.मगदूम, तसेच एस.के. पाटील, एस.आर. भिसे यांनी खारेपाटणला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेत तोडगा निघू न शकल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी वेदपाठक व एस.एल. मगदुम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी ग्रामस्थांनी दूरसंचार सेवेचा कंटाळवाणी कारभाराचा पाढा वाचला. यावर अधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून येत्या दोन, चार दिवसांत खारेपाटण दूरसंचारची विस्कळीत असलेली सेवा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.
याबाबत दूरसंचारचे सिंधुदुर्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी सिंग यानी दूरध्वनीद्वारे सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनाच्यावेळी सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच ईस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, शंकर राऊत, महेंद्र गुरव, अंजली कुबल, रवीना ब्रम्हदंडे, विरेन चिके, मंगेश गुरव, प्रवीण लोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.