सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवरील संघर्ष रोखा, आमदारांच्या मत्स्य आयुक्तांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:48 PM2018-02-09T18:48:47+5:302018-02-09T18:55:42+5:30
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना केल्या.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना केल्या.
मालवण दौऱ्यांवर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला गुरुवारी दुपारी भेट दिली. यावेळी मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज साधये, गणेश कुशे, दिलीप घारे, बाबी जोगी, भाऊ मोरजे, मिथुन मालंडकर, महेश देसाई, किसन मांजरेकर, महेंद्र पराडकर यांच्यासह पारंपरिक मच्छिमार उपस्थित होते.
समुद्रावर मच्छिमारांचा हक्क आहे. मच्छिमारांना विश्वासात घेऊन पर्ससीन मासेमारी आणि प्रखर प्रकाशझोतातील मासेमारी करणाऱ्या मत्स्य उद्योजकांच्या नौकांची तपासणी करून कारवाई करायला हवी. सागरी हद्दीत बेकायदेशीर एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका बंदरात येत नाहीत. त्या नौकांमधील मासळी छोट्या नौकेतून किनाऱ्यांवर आणली जाते.
मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी आठ जागा मच्छिमारांनी सुचविल्या होत्या. त्यानुसार शहरातील कन्याशाळा येथील जागेची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
प्रखर प्रकाशझोतातील मासेमारीला केंद्र शासनाने बंदी घातली असतानाही जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील सागरी हद्दीत सध्या अवैधरित्या मासेमारी सुरू आहे. मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. मत्स्य विभागाला कल्पना देऊनही अधिकारी कारवाईसाठी वेळेत पोहोचत नाहीत, असे बाबी जोगी यांनी सांगितले.
यावरही आमदार नाईक यांनी लक्ष घालत मत्स्य आयुक्तांना सूचना करताना जिल्हा नियोजन विभागाकडे स्पीड बोटीसाठी प्रस्ताव पाठवा. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून लोखंडी बोट देण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले.
मच्छिमारांना चांगली सेवा द्या
यावेळी महेंद्र पराडकर यांनी क्रियाशील मच्छिमारांनाच मासेमारीचे परवाने देण्यात यावेत, अशी मागणी केली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीमप्रमाणे बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण मिळवावे, असे सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना मच्छिमारांना चांगली सेवा दिल्यास वाद होणार नाहीत.
मच्छिमारांना अंगावर घेऊ नका, असे प्रदीप वस्त यांना सांगितले. वस्त यांनी आपली बाजू मांडताना मी मुजोर अधिकारी नाही. तसे वाटल्यास माझा चार्ज काढून घ्या, पण माझी नाहक बदनामी करू नका, असे स्पष्ट केले.
पर्ससीननेटवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र ही मासेमारी थांबत नसल्याने नौकाधारकांच्या नौका, जाळी अवरुद्ध करण्याची मागणी करण्यात आली. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी पंधरवड्यापूर्वी अनधिकृत मिनी पर्ससीननेटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या आठ ते दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून यावरील दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. त्या नौका अवरुद्ध करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सहआयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.