सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांचा थंड दहशतवाद : सतीश सावंत यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:41 PM2018-04-20T15:41:32+5:302018-04-20T15:41:32+5:30
गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे.
सिंधुदुर्गनगरी : गेल्या साडेतीन वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तीन जिल्हाधिकारी व दोन जिल्हा पोलीस अधिकारी यांची बदली केली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे अधिकारी वागावेत असा केसरकर यांचा थंड दहशतवाद आहे. याला उदय चौधरी यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे.
चौधरी यांचे काम शेतकऱ्यांच्या हिताचे होते. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन राजकारण करणाऱ्या केसरकर यांना २०१९ मध्येच सिंधुदुर्गची जनता बदलेल, असे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षातील पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, जिल्हाधिकारी उदय चौधरी हे कार्यतत्पर व कार्यक्षम अधिकारी होते. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांची बदली केल्याचे बोलले जात आहे. चौधरी यांनी अल्प कालावधीत केलेली कामगिरी शेतकरी हिताची होती. त्यांनी एमआरईजीएसमध्ये वृक्ष लागवडीचे केलेले काम लक्षवेधी आहे.
नर्सरीमध्ये गतवर्षी काजू कलमे शिल्लक नव्हती. जिल्हा नियोजनाचा झालेला खर्च चौधरी यांच्यामुळेच होऊ शकला. परंतु पालकमंत्री काम करताना अडचणी आणत होते. प्रस्ताव मंजूर करीत नव्हते. जिल्ह्यातील जनता त्यांच्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांना सन्मान देत होती. त्याचा राग केसरकरांना होता.
केसरकर हे सावंतवाडीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. तसेच चांदा ते बांदा योजनेत ६५ बैठकांच्या पुढे गेले नाहीत. काम करणारे अधिकारी नकोत. त्यांना केवळ बैठक घेणारे अधिकारी हवेत, असा आरोप सावंत यांनी केला.
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या जिल्ह्याच्या विकासाला खो घालणाऱ्या आहेत. त्यामुळे आपण याबाबत खेद व्यक्त करून जाहीर निषेध करतो, असे सांगत सावंत म्हणाले की, उदय चौधरी यांच्यासारखा चांगला अधिकारी पालकमंत्र्यांच्या थंड दहशतवादाला कंटाळला होता.
त्यामुळे बुधवारी आपली बदली झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ आपला पदभार अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे देत स्वत:ला कार्यमुक्त करून घेतले. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे भाजपने केसरकरांची ही वृत्ती रोखली पाहिजे, असे आवाहन यावेळी सावंत यांनी केले.
नारायण राणे यांच्याकडून शिकून घ्यावे; सावंत यांचा सल्ला
केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. मर्जीतील अधिकारी आणूनसुद्धा त्यांना अंकुश ठेवता आलेला नाही. याला कारण म्हणजे त्यांचा प्रशासकीय अभ्यास, अनुभव नाही. त्यामुळे प्रशासकीय अभ्यास कसा असावा? प्रशासनावर अंकुश कसा ठेवावा? याची गरज असल्यास माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्याकडून शिकून घ्यावे, असा सल्ला यावेळी सावंत यांनी दिला.
केसरकर यांचे पटणार तरी कोणाशी?
पालकमंत्री केसरकर यांचे जिल्ह्यातील राजकारण्यांशी पटत नाही. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशी पटत नाही. त्यांचे पटणार तरी कोणाशी ? असा प्रश्न यावेळी सावंत यांनी केला. त्यांना आपल्या मर्जीत राहणारे अधिकारी पाहिजेत. त्यांनी एकदाच ठरवावे. कोणते अधिकारी आपले ऐकणार, त्यानुसार एकदाच काय तो निर्णय घ्यावा, असेही आवाहन सावंत यांनी यावेळी केले.