सिंधुदुर्ग : दोघा व्यावसायिकांवर गुन्हा, कोळंब खाडीपात्रात अनधिकृत जलपर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:05 PM2018-08-03T17:05:33+5:302018-08-03T17:11:09+5:30
कोळंब खाडीपात्रात अनधिकृतरित्या जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंदर विभागाच्या सुषमा कुमठेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सागरी व खाडीपात्रातील जलपर्यटनास बंदीचे उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन यांनी दिली.
मालवण : कोळंब खाडीपात्रात अनधिकृतरित्या जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
बंदर विभागाच्या सुषमा कुमठेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सागरी व खाडीपात्रातील जलपर्यटनास बंदीचे उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन यांनी दिली.
अनधिकृत पर्यटन बोटिंग व्यवसाय संबंधित व्यावसायिकांकडून सुरू असल्याने गुरुवारी सकाळी ११.३० वाजता बंदर निरीक्षक कुमठेकर यांनी कोळंब खाडी येथील खापरेश्वर मंदिरानजीक बोटिंग व्यवसाय सुरू असल्याने दुपारच्या सत्रात पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. यावेळी वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाऊ नार्वेकर, गावकर आदी बंदर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सुषमा कुमठेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कोळंब खाडीपात्रात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या सत्यवान उद्धव खराडे (कोळंब) व सतीश रामचंद्र आचरेकर (मेढा) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी मालवण पोलिसांनी कुमठेकर यांच्या तक्रारीनंतर दोघा व्यावसायिकांवर सायंकाळी उशिरा गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन या करीत आहेत.
दंडही केला वसूल
कोळंब खाडीपात्रात जलक्रीडा प्रकारांवर बंदी असताना अनधिकृत जलपर्यटन सुरू असल्याची माहिती बंदर विभागाला प्राप्त झाली होती. बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बोटिंग व्यावसायिकांना यापूर्वी कारवाईची नोटीस बजावून दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली होती.