सिंधुदुर्ग : साताऱ्याच्या तरुणावर गुन्हा, अन्य तिघांना समज देत सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:29 PM2018-07-09T15:29:13+5:302018-07-09T15:31:13+5:30
पावसाचा जोर वाढल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला भुईबावडा घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत असलेले चौघेजण आढळून आले. त्यांच्यापैकी पाटण (सातारा) येथील अमोल पांडुरंग बाकाडे (२९) याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला. तर अन्य तिघांना समज देऊन सोडण्यात आले.
वैभववाडी : पावसाचा जोर वाढल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला भुईबावडा घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत असलेले चौघेजण आढळून आले. त्यांच्यापैकी पाटण (सातारा) येथील अमोल पांडुरंग बाकाडे (२९) याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला. तर अन्य तिघांना समज देऊन सोडण्यात आले.
घाटातील पावसाळी पर्यटनाला अतिउत्साही आणि मद्यपी पर्यटकांचा होणारा उपद्रव टाळण्याच्या हेतूने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी ही कारवाई केली आहे.
करुळ व भुईबावडा घाटातील धबधब्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे घाटमार्गांवर दरडी कोसळून अडथळा होत आहे. त्यामुळे दोन्ही घाटांमध्ये पोलीस पथके दररोज फेरफटका मारीत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, पोलीस नाईक सचिन सापते, राजेंद्र खेडकर, विलास राठोड, भुईबावडा घाटातून गगनबावड्याकडे जात असताना अमोल बाकाडे, संदीप अशोक चव्हाण, संतोष नामदेव मंचेकर (दोघे रा. मुंबई), संकेत संतोष शिंदे (रा. रिंगेवाडी) हे चौघेजण घाटात भुईबावडा रिंगेवाडीनजीक आढळून आले.
त्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये एक दारुची बाटली आढळून आली. ते घाटात बसून दारू पिण्याच्या तयारीत होते. त्यामुळे अमोल बाकाडेवर मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तर उर्वरित तिघांना समज देऊन सोडण्यात आले. पावसाळ्यात गस्त सुरू राहणार अतिउत्साही व मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे, असे दत्तात्रय बाकारे यांनी सांगितले.