सिंधुदुर्ग : वाळू व्यावसायिकांची ग्रामस्थांवर दादागिरी, सरंबळ नदी किनाऱ्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:44 PM2018-05-18T15:44:47+5:302018-05-18T15:45:45+5:30
सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर घडला.
कुडाळ : सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर घडला.
अखेर प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांनी वाळू व्यावसायिकांची दादागिरी पाहून या ठिकाणी होणारी वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली आहे. जोपर्यंत ग्रामस्थांच्या निवेदनावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उत्खनन व वाहतूक बंद राहणार आहे.
कुडाळ सरंबळ येथे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय होऊन येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासनाने लक्ष देऊन हा रस्ता सुस्थितीत आणावा यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली होती.
दोन आंदोलनानंतर सुध्दा येथील रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सरंबळ येथे वाळू वाहतूक करणारे डंपर अडवून आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाची माहिती मिळताच कुडाळचे प्रभारी तहसीलदार टी. एच. मठकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे तसेच महसूल, पोलीस, बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी ९.३० वाजता सरंबळ येथे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या दिवस रात्र वाळू वाहतुकीमुळे येथील रस्त्याची दुर्दशा झालेली असून जोपर्यंत येथील रस्ता सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत येथून वाळू वाहतूक केली जाऊ देणार नसल्याचा इशारा देत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. तसेच मागण्यांचे लेखी निवेदन यावेळी दिले.
यावेळी मठकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी येथील रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव केलेला आहे, असे सांगितले. येथील आंदोलनकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
त्याचवेळी ग्रामस्थांनी उत्खनन व वाहतूक होणाऱ्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी प्रभारी तहसीलदार मठकर यांना घेऊन गेले. यावेळी वाळू व्यावसायिक ग्रामस्थांच्या अंगावर धावून आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
अखेर प्रभारी तहसीलदार टी. एच. मठकर यांनी वाळू व्यावसायिकांची दादागिरी पाहून या ठिकाणी होणारी वाळू उत्खनन व वाहतूक बंद केली आहे. जोपर्यंत ग्रामस्थांच्या निवेदनावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उत्खनन व वाहतूक बंद राहणार आहे.
पोलीस बंदोबस्त
सरंबळ-बागवाडी येथील ग्रामस्थांनी वाळू व्यवसायामुळे होणारा त्रास महसूल विभागाकडे मांडला. त्यावरून या गावातून वाळू उत्खनन, वाहतूक बंद करण्याचा निर्णय दिला. त्या अनुषंगाने त्याठिकाणी असलेले डंपर व रॅम्पला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. दरम्यान ग्रामस्थांची पोलीसांशी शाब्दिक बाचाबाची झाली.