सिंधुदुर्ग :गव्याच्या हल्ल्यातील बस चालकाचा मृत्यू, होडावडा ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:16 PM2018-04-11T15:16:48+5:302018-04-11T15:16:48+5:30
गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या एसटी बस चालक सतीश जनार्दन गावडे (४५) यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी होडावडा ग्रामस्थांनी मंगळवारी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराओ घालत सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे यांना जाब विचारला.
सिंधुदुर्ग : गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या एसटी बस चालक सतीश जनार्दन गावडे (४५) यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी होडावडा ग्रामस्थांनी मंगळवारी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराओ घालत सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे यांना जाब विचारला.
आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा, मृतदेह कार्यालय परिसरात आणून ठेवणार, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
अखेर वनविभागाने पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची शिफारस करण्याचे लेखी पत्र देत तिच्या नावे बँकेत सात लाख रुपये कायम ठेव ठेवली जाईल. तसेच एक लाख रुपयांची तत्काळ शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेराओ मागे घेण्यात आला.
होडावडा येथील सतीश गावडे हे वेंगुर्ले एसटी आगारात चालक म्हणून नोकरीस होते. ते शनिवारी पहाटे ६ वाजता आपल्या दुचाकीने वेंगुर्ले आगारात ड्युटीवर जात असताना सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तुळस-कुंंभारटेंब येथे गव्याच्या हल्ल्यात ते रस्त्यावर कोसळून गंभीररित्या जखमी झाले होते. ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले असता शाळकरी मुलीने पाहिल्यावर त्यांना ग्रामस्थांनी उपचाराकरिता हलविले होते.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनाम्यात घटनास्थळी गव्यांच्या पायाचे ठसे दिसून आले होते. गेले दोन दिवस गावडे यांच्यावर बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ते मृत झाले होते.
यावेळी वेंगुर्लेचे माजी पंचायत समिती सभापती आबा कोंडुसकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शिवसेना संपर्कप्रमुख राजू नाईक, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, गुरूनाथ केसरकर, आत्माराम दळवी, बाळा जाधव, संतोष दळवी, शैलेश धावडे, शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख शब्बीर मणियार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मृत सतीश गावडे यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गावडे यांना आदर्श बसचालक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा या चांंगल्या कर्मचाºयाला एसटी प्रशासन मुकले. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी होडावडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर घेराओ मागे
यावेळी झालेल्या चर्चेत सुर्वे यांनी शासनाकडून तत्काळ मदत म्हणून एक लाख रुपये देण्याबरोबर कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या नावे सात लाख रुपये कायम ठेव बँकेत ठेवण्याचे मान्य केले.
याशिवाय पतीच्या पश्चात कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याचे पत्नीने एसटी महामंडळ, वनविभाग व शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केल्यास त्यासाठी आवश्यक ती सर्व शिफारस वनविभागाकडून करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी आपला घेराओ मागे घेतला.