सिंधुदुर्ग : जानवली नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:27 PM2018-07-27T16:27:06+5:302018-07-27T16:29:17+5:30
कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील स्मशानभूमीनजीक जानवली नदीपात्रातील पाण्यात बुडून विजय कन्नान (२३) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील स्मशानभूमीनजीक जानवली नदीपात्रातील पाण्यात बुडून विजय कन्नान (२३) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडू राज्यातील मूळ रहिवासी असलेला विजय कन्नान हा युवक आपल्या सहकाऱ्यांसह कलमठ बिडयेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होता. तसेच हळवल येथे कार्यालय असलेल्या ग्लेझ इंडिया प्रा. लि. या कंपनीत तो काम करीत होता.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो जानवली नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आणखीन काही ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले.
कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कळविण्यात आले. त्यांनी तहसील कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच इतर महसूल विभागाचे कर्मचारी लाईफ जॅकेट, दोरखंड असे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
कलमठ येथील सामाजिक कार्यकर्ते बाबू आचरेकर यांनाही बोलाविण्यात आले. अथक प्रयत्नानंतर इतर ग्रामस्थांच्या मदतीने बाबू आचरेकर यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजय कन्नान याला पाण्याबाहेर काढले.
कलमठ कलेश्वर मंदिराजवळील कोंडीत तो त्यांना आढळून आला. पाण्याबाहेर काढल्यानंतर विजय हा मृत झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण व हवालदार जीवन कुडाळकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.