सिंधुदुर्ग : इमारत स्थलांतर विषय पुन्हा वादग्रस्त, देवगड पंचायत समिती बैठकीत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:25 PM2018-05-05T14:25:58+5:302018-05-05T14:25:58+5:30
देवगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरला असून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी बैठकीत विभागाला दिला.
देवगड : देवगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरला असून हे कार्यालय देवगड पंचायत समिती इमारतीमध्ये स्थलांतरित न केल्यास लोकप्रतिनिधी म्हणून योग्य ती कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा आक्रमक इशारा देवगड पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी पंचायत समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाला दिला.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या अनुपस्थितीत उपसभापती संजय देवरूखकर यांच्या अध्यक्षतेखाली किसान भवन सभागृहात पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर उपस्थित होत्या.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय स्थलांतरणाचा विषय या बैठकीत देखील गाजला. देवगड पंचायत समिती इमारतीमध्ये कार्यालयाला नियमानुसार क्षेत्रफळ असलेली जागा नसल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कार्यालय स्थलांतरित करण्यास नकार दिला.
यामुळे संतप्त झालेल्या सदस्य अजित कांबळे यांनी जागेची कारणे सांगू नका असे खडे बोल सुनावत यासाठी पर्याय आहेत. मात्र, कार्यालय स्थलांतरित करण्याची मानसिकता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाही असे सांगून आपण हे कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करू व पुढील पाऊले उचलू असा इशारा पाणीपुरवठा विभागाला दिला.
कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा, अशी मागणी सदस्य लक्ष्मण पाळेकर यांनी केली. ग्रामपंचायतीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी गटविकास अधिकारी व संबंधित विस्तार अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेट द्यावी अशी सूचना पाळेकर यांनी मांडली. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून टंचाईच्या कामांना तीन दिवसात मंजुरी द्यावी अशी मागणी सदाशिव ओगले यांनी केली.
एमआरजीएसमधून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीचे प्रस्ताव ग्रामसभेने मंजूर करूनही अंतराचा दाखला व वरिष्ठ भूवैज्ञानिक दाखला देण्यासाठी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. सन २०१७-१८ मधील प्रस्ताव अंतराचे दाखले देण्यास टाळाटाळ करून लघुपाटबंधारे विभागाने रखडवले आहे असा आरोप करीत सदाशिव ओगले यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली.
एसटी फेरीच्या समस्येबाबत लक्ष वेधले
ऐन हंगामात एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या. याकडे पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाळेकर यांनी लक्ष वेधले. यावेळी देवगड आगारव्यवस्थापक डी. एम. चव्हाण यांनी आगारामध्ये १३ गाड्या कमी असल्यामुळे फेऱ्यांचा नियोजनावर परिणाम होत असल्याचे सांगितले