सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याची मागणी : नागेंद्र परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 05:19 PM2018-07-06T17:19:37+5:302018-07-06T17:22:15+5:30
कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली.
सिंधुदुर्ग : कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली.
महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त सूचना, समस्या व तक्रारी यांची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेऊन तशाप्रकारचे शक्य असलेले बदल व उपाययोजना नॅशनल हायवे आॅथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम (महामार्ग)चे अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनी यांचेकडून प्रयत्नपूर्वक करून घेतलेले असल्याने कुडाळ व वागदे येथे ६० मीटरऐवजी ४५ मीटरच जमीन संपादित केली जाणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सतीश कुडाळकर, नागेश नाईक हे उपस्थित होते.
परब यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असून हे काम सुरू असताना येथील वाहनचालक, ग्रामस्थ, व्यापारी व इतर सर्व संबंधित घटकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गाचे स्वरूप तेथील जनतेला अपेक्षित असावे असे करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांकडून केली जात आहे.
त्यामुळे या सर्वांच्या तक्रारी, सूचना व मागण्या विनायक राऊत यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी याबाबत चौपदरीकरणाच्या कामात शक्य असलेले बदल अधिकारी व कंपनी यांच्याकडून करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
कुडाळ शहर व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नागरिकांनी चौपदरीकरणासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटरचेच संपादन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार वागदे व कुडाळ येथील महामार्गासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगत पिंगुळी येथील वडगणेश मंदिर व साई मंदिर संरक्षित करणे किंवा इतर काही प्रश्न असतील असे अनेक प्रश्न वेळोवेळी निदर्शनास आल्यावर त्याचे निराकरण खासदार राऊत यांनी करून घेतलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
..तोपर्यंत कुडाळ महामार्गाचे काम बंद!
कुडाळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर होऊनही तो पूर्ण होत नाही तोपर्यंत कुडाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद राहील, असेही नागेंद्र परब यांनी सांगितले.