सिंधुदुर्ग : आंबोलीतील ग्रामस्थांचे उपोषण, पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:41 PM2018-03-07T15:41:21+5:302018-03-07T15:41:21+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या उपोषणात विलास गावडे, जगन्नाथ गावडे, शशिकांत सावंत, फटू सावंत, राजाराम गावडे, शाम गावडे, तानाजी गावडे, सोमा गावडे आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर आहे. या योजनेंतर्गत विहिरीचे काम पूर्ण आहे. तसेच पाईपलाईनचेही काम पूर्ण आहे.
मात्र, नवीन बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या जागेवरून वाद असल्याने ही योजना सुरु करण्यात आली नव्हती. पाण्याची आवश्यकता पाहता जुन्या पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायत आंबोली कार्यालयाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
ही योजना सुरु न झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच काही दिवसांनी पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. तरीही ठोस अशी उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.
त्यामुळे प्रशासने या ठिकाणी निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता या आंबोली सतीचीवाडी, बंगलेवाडी नळपाणी योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे व ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आंबोली सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
पाण्याअभावी चाकरमान्यांची गावाकडे पाठ
आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेली ५ वर्षे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पाण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे येथील मुंबईतील चाकरमानी गावाकडे फिरकत नसल्याचे या ग्रामस्थांनी स्पष्ट केले. गावात पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपीटमुळे ग्रामस्थांबरोबरच चाकरमान्यांमध्येही नाराजीचे सूर आहेत