सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:24 PM2018-10-20T13:24:38+5:302018-10-20T13:26:41+5:30
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाचा ताण व सरासरी रुग्ण तपासणी संख्या लक्षात घेता तीनच डॉक्टर कार्यरत असून, तज्ज्ञ डॉक्टरांची व एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवून देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत हे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र डी.एम.ओ.यू.टी. करण्याकरिता सावंतवाडी रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर नाहीत. परिणामी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत व या कामाचा ताण तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत असल्याचे राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक वर्षे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत डी.एम.ओ.यू.टी. करण्यासाठी नेमणूक केलेल्या पाच डॉक्टरांनी अचानकपणे गेला महिनाभर ड्युटी करण्यास नाकारले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांवर या कामाचा ताण वाढलेला आहे. रात्रपाळीसाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरांची नितांत गरज आहे, असे मसूरकर यांनी म्हटले आहे.
डॉ. दुर्भाटकर हे दरमहा अडीचशे ते तीनशे प्रसुती रुग्णालयामध्ये करत असून, सरासरी दीडशे रुग्ण हृदयरोगतज्ज्ञ अभिजीत चितारी व बालरोगतज्ज्ञ डॉ. सावंत हे सरासरी ५० रुग्णांची तपासणी दिवसासाठी करत आहेत.
गेली दहा वर्षे सावंतवाडीमध्ये जनरल सर्जन अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने छोट्यामोठ्या अपघातातील रुग्णांनाही बांबोळी-गोवा येथे जावे लागते. जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये असूनही व्हेंटिलेटर, स्कॅनिंग यंत्र नसल्याने गोवा, मुंबईचा आधार घ्यावा लागतो, हे फार दुदैर्वी आहे. याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.
गेले दोन महिन्यांहून अधिक काळ निविदा नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी काम करणे सोडून दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसे न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जनआंदोलन करून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही मसुरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.