सिंधुदुर्ग : उपवनसंरक्षक धारेवर, सौरकुंपणाचे काम रखडले : ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:25 PM2018-08-25T16:25:08+5:302018-08-25T16:28:06+5:30
मळगाव-वेत्ये येथे सुरू असलेल्या सौरकुंपणाचे रखडलेले काम आणि गव्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी सौरकुंपणाचे जलदगतीने काम करण्यात येईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
तळवडे : मळगाव-वेत्ये येथे सुरू असलेल्या सौरकुंपणाचे रखडलेले काम आणि गव्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी सौरकुंपणाचे जलदगतीने काम करण्यात येईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने नरेंद्र्र डोंगराच्या पायथ्यालगत वनखात्यामार्फत सौर कुंपणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ४० लाखांचा निधी मंजूर होऊन भूमिपूजनही झाले. मात्र, आठ महिने उलटले तरी काम अपूर्णावस्थेत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी चव्हाण यांना जाब विचारला.
मळगाव ग्रामपंचायत किंवा वन समितीला विचारात न घेता निधी खर्ची घालून बाकीची रक्कम वनसमितीच्या नावे टाकता हे कसे, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण यासह अनेक प्रश्नांचा भडिमार माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र्र परब व शिवसेना तालुकप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. तर वनविभागाची मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा संजू परब यांनी दिला.
यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी जलदगतीने सौरकुंपणाचे काम करण्याची ग्वाही दिली. यावर ग्रामस्थांनी मंगळवारपर्यंत काम सुरू करा, अन्यथा सौर कुंपणाचे खांब आणून सावंतवाडी वनविभागात जमा करू, असा इशारा दिला.
यावेळी स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र्र परब, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दिलीप सोनुर्लेकर, दाजी सावंत, नीलेश कुडव, हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, सावंतवाडी नगरसेवक सुधीर आडिरवरेकर तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटदार कोल्हापूरचा
आतापर्यंत दहा लाख रुपये संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. असे असूनही काम अपूर्णावस्थेत का? हे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असताना कंत्राटदार मात्र कोल्हापूरचा कसा, असे सवाल मळगाव ग्रामस्थांनी उपस्थित केले. मात्र, यावर समर्पक उत्तर न देता आॅनलाईन टेंडर होते असे सांगून उपवनसंरक्षक चव्हाण यांनी हात वर केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.