सिंधुदुर्ग : वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत, दुचाकीस्वाराची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:30 PM2018-01-04T12:30:25+5:302018-01-04T12:33:47+5:30
वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणे मालवण येथील चौघांना महागात पडले. भरड नाका येथे वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविले असता दुचाकीस्वार कुणाल किशोर खानोलकर (रा. भरड, मालवण) याने दादागिरी व दमदाटी करत तिघांना बोलावून आणले.
मालवण : वाहतूक नियमांचा भंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणे मालवण येथील चौघांना महागात पडले. भरड नाका येथे वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविले असता दुचाकीस्वार कुणाल किशोर खानोलकर (रा. भरड, मालवण) याने दादागिरी व दमदाटी करत तिघांना बोलावून आणले.
यावेळी मंदार कांदळकर, अनिल कांदळकर व एका अनोळखी व्यक्तीने अंगावर धावून येत हुज्जत घातली. याप्रकरणी वाहतूक पोलीस सुरजसिंह सत्यनारायणसिंह ठाकूर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार ठाकूर भरड नाका येथे सकाळी ड्युटीवर आले. दुपारच्या सुमारास कुणाल किशोर खानोलकर हा दुचाकी (एमएच ०७ एए २५९५) घेऊन डबल सीट घेऊन भरड नाक्यावरून जात होता. यावेळी ठाकूर यांनी शिटी वाजवीत त्याला थांबवून दुचाकीची पाहणी केली.
दुचाकीच्या पुढील बाजूस नंबरप्लेट दिसून आली नाही. तसेच दुचाकीला साईड आरसे देखील नव्हते. त्यामुळे ठाकूर यांनी कागदपत्रे मागितली असता कुणाल याने कागदपत्रे व लायसन नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकूर यांनी तडजोड शुल्क म्हणून २०० रुपये दंडाची पावती भरण्यास सांगितले.
यावर कुणाल याने मी पोलिसांना पैसे देतोय असे सर्वांना ओरडून सांगू लागला. तसेच दादागिरी दाखवू लागला. त्यामुळे ठाकूर यांनी पावती रद्द करून मोटार वाहन अधिनियमनुसार नोटीस देत कुणाल याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली.
अनिल कांदळकर, मंदार कांदळकर व अन्य एक व्यक्ती अशा तिघांना कुणाल नाक्यावर घेऊन आला. या तिघांनी आपल्या अंगावर धावून येत गाडी आमची असल्याचे सांगत गाडी ताब्यात घेण्याचा तुला अधिकार आहे का? आमची गाडी ताब्यात का घेतलीस? असे सांगत मारण्यासाठी हातवारे केले असे तक्रारीत म्हटले आहे.