देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:53 PM2018-02-23T13:53:46+5:302018-02-23T13:59:39+5:30
हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे.
देवगड : हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे.
यामुळे बागायतदारांना चांगला दर मिळेल असे पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश राणे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक गणपत गावकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, उपाध्यक्ष चंद्रकांत कावले उपस्थित होते.
हापूस आंब्याला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता थेट सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांकडून आंबा खरेदी करावा अशा सुचना महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या अधिकाºयांना आमदार नीतेश राणे यांनी केल्या होत्या.
त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी या कंपनीचे अधिकारी कुणाल रावत व रीना वर्मा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हापूस आंबा खरेदीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर यंदापासून कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आंबा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांमधील काही बागांची प्रत्यक्ष पाहणी केली असे पत्रकार परिषदेत प्रकाश राणे यांनी सांगीतले.
आंब्याचा विक्री व्यवस्थेतील दुरवस्थेमुळे शेकडो हेक्टर आंबा बागायतींमध्ये उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांनी थांबविले होते. उत्पादनामध्ये होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मेळ नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यातच आंब्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
याचा विचार करून आमदार नीतेश राणे यांनी महिंंद्रा अँड महिंद्रा कंपनीमार्फत आंब्याला योग्य भाव देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले असून यातून निश्चितच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असा विश्वास यावेळी प्रकाश राणे यांनी व्यक्त केला.