सिंधुदुर्ग : देवगड नगरपंचायत : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:50 PM2018-04-21T17:50:51+5:302018-04-21T17:50:51+5:30
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर व उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. सव्वा वर्षाचा त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या पक्षाध्यक्षांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर व उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. सव्वा वर्षाचा त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या पक्षाध्यक्षांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.
योगेश चांदोस्कर
देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे पहिल्या अडीच वर्षांसाठी खुले आरक्षित झाले होते. या पहिल्याच सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदी महिला उमेदवार प्रियांका साळसकर यांना संधी मिळाली होती. तर उपनगराध्यक्षपदी योगेश चांदोस्कर यांना संधी मिळाली होती. या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी पक्षाच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामे दिले आहेत.
आता देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, उमेश कणेरकर व संजय तारकर यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चिली जात आहेत. तर उपनगराध्यक्ष पद हे महिला नगरसेविकेला द्यायचे ठरले तर प्रणाली माने व उज्ज्वला अदम यांच्या नावांची चर्चा देवगड शहरात केली जात आहे.
स्वाभिमानचे पूर्णपणे बहुमत; नीतेश राणे निर्णय घेणार
पहिल्या अडीच वर्षांसाठी सध्या खुले आरक्षण असून पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण आरक्षित झाले आहे. यामुळे आता सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपदासाठी योगेश चांदोस्कर यांच्या नावाचे पारडे जड आहे. तर उमेश कणेरकर व संजय तारकर यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे.
मात्र नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष उमेदवारांबाबत आमदार नीतेश राणे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. देवगड-जामसंडे नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे दहा नगरसेवक, एक अपक्ष, भाजपाचे चार नगरसेवक, शिवसेनेचा एक व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. या नगरपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे पूर्णपणे बहुमत आहे.