सिंधुदुर्ग: बांदा येथील श्री बांदेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, पालखी प्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:11 IST2018-02-14T19:07:11+5:302018-02-14T19:11:50+5:30
बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आरंभ झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त बांदेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सिंधुदुर्ग: बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आरंभ झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री श्रींच्या मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
मंगळवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासून ते दुसरे दिवशी सकाळी सुर्योदयापर्यंत ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात अष्टौप्रहर श्रींवर रुद्रावर्तन व अभिषेक करण्यात आला. सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण झाले. सायंकाळी विविध मंडळांची भजने झाली. त्यानंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा भाविकांच्या उपस्थितीत व शिवनामाच्या जयघोषात पार पडली.
महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण पित्रे यांच्या आस्वाद कोकम तर्फे येणाºया भाविकांसाठी मोफत कोकम सरबत वाटप करण्यात आले. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्रींची पालखी श्री देव पाटेश्वर भेटीसाठी निघली, त्यानंतर वाजत-गाजत राजमार्गाने विविध देवस्थानांकडे अभंग गायन व आरती करुन श्री बांदेश्वर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पार पडली. रात्री १० वाजता इन्सुली दशावतार नाट्यमंडळ, इन्सुली यांचा भक्ती महिमा हा नाट्यप्रयोग होईल. गुरुवार १५ रोजी दुपारी १.३० ते ३ या वेळेत समाराधना होऊन या समारंभाची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.