सिंधुदुर्ग : कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने देवश्री नवघरे यांचा युवा गंधर्व सन्मानाने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:17 PM2017-12-21T15:17:53+5:302017-12-21T15:27:29+5:30

शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या युवा कलाकाराला कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा  युवा गंधर्व सन्मान  नाशिक येथील युवा प्रतिभासंपन्न गायिका देवश्री नवघरे यांना देऊन गौरविण्यात आले. या नेत्रदीपक सोहळ्याच्या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sindhudurg: Devshree Navghare's Youth Gandharva honored by Gandharva Foundation in Kankavali. | सिंधुदुर्ग : कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने देवश्री नवघरे यांचा युवा गंधर्व सन्मानाने गौरव

आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत देवश्री नवघरे यांनी सुस्वर गायन केले.

googlenewsNext
ठळक मुद्देआशिये येथे नेत्रदीपक सोहळा, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित समीर डुबळेंकडून संगीताचे महत्वअवघा रंग एक झालाने सांगता, पुढील गंधर्व सभा २७ जानेवारीला

कणकवली : शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या युवा कलाकाराला कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा  युवा गंधर्व सन्मान नाशिक येथील युवा प्रतिभासंपन्न गायिका देवश्री नवघरे यांना देऊन गौरविण्यात आले. या नेत्रदीपक सोहळ्याच्या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने गेले वर्षभर दर महिन्याला अभिजात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व विचार संगीत रसिकांपर्यत पोहोचविण्यासाठी  गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे करण्यात येते.

चोखंदळ रसिक निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या गंधर्व संगीत सभेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने युवा गंधर्व सन्मान देण्याचे गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने निश्चित करण्यात आले होते. लेखा परीक्षक दामोदर खानोलकर यांनी पुरस्कृत केलेला हा सन्मान देवश्री नवघरे यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या समारंभासाठी पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. अशोक रानडे यांचे शिष्य पं. समीर डुबळे, रत्नागिरी येथील आसमंत फाऊंडेशनचे संचालक नंदकुमार पटवर्धन यांच्यासह संगीत क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नंदकुमार पटवर्धन यांनी रत्नागिरी येथील आसमंत या संस्थेचे कार्य विशद करतानाच आशिये येथील गंधर्व सभा आयोजनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. तसेच गाणे कसे ऐकावे ? याबाबत पं. समीर डुबळे यांनी कणकवलीत कार्यशाळा घ्यावी अशी विनंती केली.

या उपक्रमास रसिकांचा असाच उदंड प्रतिसाद लाभल्यास आपण आणखीन एक कार्यक्रम पुढील काही दिवसात पुरस्कृत करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर यावेळी पं. समीर डुबळे यांनी कार्यशाळा घेण्यास तत्काळ संमती दर्शविली. त्यानंतर गंधर्व मासिक संगीत सभेचे १२ वे पुष्प देवश्री नवघरे यांनी गुंफले. संगीत रसिकांनी या संगीत सभेच्या माध्यमातून सुरांचा वैशिष्टयपूर्ण आविष्कार अनुभवला.

समीर डुबळेंकडून संगीताचे महत्व

यावेळी पं.समीर डुबळे यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलित शास्त्रीय संगीताचे महत्व व सौंदर्य विषद केले. ते म्हणाले, गायकाकडे इमान , इशारा व इरादा या गोष्टी असतील तर त्याच्या सादरीकरणाने एक प्रकारची ऊर्जा निर्माण होवून रसिक त्याचा उत्तम प्रकारे आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर असे गायन निश्चितच रसिकांच्या हृदयाला भिडत असते. त्यामुळे गायकानी या गोष्टिंचा विचार करून आपली संगीत क्षेत्रातील साधना अखंडितपणे सुरु ठेवावी आणि उज्वल यश मिळवावे.

अवघा रंग एक झालाने सांगता

देवश्री नवघरे यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत सादर करून रसिकमनाचा ठाव घेतला. त्यांनी मैफलीची सुरुवात मुलतानी रागातील बंदिशीने केली. त्यानंतर राग तिलक कामोद मधील बंदिश व तराणा सादर केला.

किशोरी आमोणकर यांनी अजरामर केलेल्या अवघा रंग एक झाला या भैरवीने मैफिलीची सांगता केली. त्यांना हार्मोनियम साथ पं.रामभाऊ वीजापुरे यांचे शिष्य प्रसाद शेवडे तर तबला साथ पं. रामदास पळसुले यांचे शिष्य प्रसाद करंबेळकर व तानपुरा साथ प्रियांका मुसळे यांनी केली. ही गंधर्व संगीत सभा आसमंत फाऊंडेशनचे नंदकुमार कुलकर्णी यांनी पुरस्कृत केली होती.

पुढील गंधर्व सभा २७ जानेवारीला

सिंधुदुर्ग , रत्नागिरी, गोवा येथील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, जाणकार तसेच संगीत रसिक व कलाकार या गंधर्व संगीत सभेच्या वेळी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गंधर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी मानले. तर पुढील गंधर्व संगीत सभा २८ जानेवारी रोजी होणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहिर केले.

 

Web Title: Sindhudurg: Devshree Navghare's Youth Gandharva honored by Gandharva Foundation in Kankavali.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.