सिंधुदुर्ग : हत्तीचे विजघरात धुमशान, केळी बागायतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:12 PM2018-03-16T18:12:20+5:302018-03-16T18:12:20+5:30
तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरविणाऱ्या टस्करने बुधवारी रात्री विजघर येथे केळी बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरविणाऱ्या टस्करने बुधवारी रात्री विजघर येथे केळी बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेले हत्तीसंकट काही केल्या दूर होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरदिवशी जंगली हत्ती अपार मेहनत घेऊन फुलविलेल्या केळी, माड बागायतींचे अतोनात नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
वनविभाग तकलादू उपाययोजना करण्यापलीकडे हत्तींचा कायम बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याने हत्तींकडून नुकसानी सुरूच आहे. विजघर येथे बुधवारी रात्री पुन्हा एकदा हत्तींमुळे केळी बागायतीचे नुकसान झाले.
बागायतदार सिद्धेश सूर्याजी राणे यांच्या केळी बागायतीत घुसून टस्कर हत्तीने लाखो रुपयांचे नुकसान केले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून वनविभागाने हत्ती बंदोबस्तासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.