सिंधुदुर्ग : यशवंत पंचायत राज पुरस्कारांचे वितरण, राज्यपालांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:13 PM2018-10-27T12:13:02+5:302018-10-27T12:17:27+5:30
यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ मध्ये यशस्वी ठरलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्यपाल सी विद्यासागरराव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ मध्ये यशस्वी ठरलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्यपाल सी विद्यासागरराव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय द्वितीय, कुडाळ पंचायत समितीला राज्यस्तरीय द्वितीय व कोकण विभाग प्रथम, तर मालवण पंचायत समितीला कोकण विभाग द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदअध्यक्षा रेश्मा सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
जिल्हा परिषदेच्या पुरस्कार स्विकारण्यासाठी अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सायली सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर आदी उपस्थित होते.
कुडाळ पंचायत समिती चा पुरस्कार स्विकारण्यासाठी सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उपसभापती श्रेया परब, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पंचायत समिती सदस्या राऊळ, रविंद्र पोवार, तात्या पवार, रतन कदम, अमित तेंडुलकर उपस्थित होते. मालवण पंचायत समिती चा पुरस्कार स्विकारण्यासाठी सभापती सोनाली कोदे, तत्कालीन सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, अतिरिक्त गटविकास अधिकारी संजय गोसावी, कक्ष अधिकारी शिवाजी पवार, विठ्ठल मालंडकर आदी उपस्थित होते.
पुरस्कारांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बोलबाला
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पंचायत राज सस्थांचे योगदान मोठे असते. राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज सस्थामार्फत राबविल्या जातात. अशाप्रकारे चांगले काम करणाऱ्या पंचायत राज संस्थाना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने २००५-०६ पासून यशवंत पंचायत राज अभियान सुरु केले. त्यानुसार २०१७-१८ साठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ, मालवण पंचायत समिती यांनी या वित्तीय वर्षात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रधान सचिव असीम गुप्ता, कोकण आयुक्त डॉ जगदीश पाटील, उपायुक्त गणेश चौधरी आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेला १७ लाख रुपये, कुडाळ पंचायत समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे १५ लाख रुपये व कोकण विभाग प्रथम क्रमांकाचे ९ लाख रुपये तर कोकण विभाग द्वितीय क्रमांक आलेल्या मालवण पंचायत समिती ला ७ लाख रुपये तसेच सर्वांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.