सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल
By admin | Published: June 13, 2017 11:32 PM2017-06-13T23:32:01+5:302017-06-13T23:32:01+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभाग पुन्हा राज्यात अव्वल आला आहे. कोकणचा निकाल ९६.१८ टक्के इतका लागला आहे. कॉपीविरहित निकाल हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा कोकण विभागाने कायम ठेवले असून, एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही.
शनिवार, दि. २४ जून रोजी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता शाळेमध्ये गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय निकालात ९७.५५ टक्के निकाल लागलेला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दोन जिल्ह्यात मिळून २७ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाईव्ह’मध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत.
मंडळाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. कोल्हापूर मंडळाचा ९३.५९ टक्के, तर पुणे मंडळाचा ९१.९५ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून, तो ८३.६७ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २० हजार ६२७ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यातील १९ हजार ७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६९ टक्के इतके आहे. दोन जिल्ह्यांतून १८ हजार ९९० विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील १८ हजार ३६६ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.०२ टक्क्यांनी अधिक आहे.
कोकण बोर्डाने स्थापना झाल्यापासून दहावी आणि बारावी या दोन्ही निकालांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून आणि त्याआधीचे एक वर्ष कोल्हापूर बोर्ड असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला अव्वल दर्जा कायम ठेवला होता. याहीवेळी ही परंपरा कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार ५९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १२ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५५ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार १९ परीक्षेला बसले होते. त्यातील २५ हजार ८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९५.५४ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल २.०१ टक्क्यांनी अधिक आहे.
कॉपीचे प्रमाण शून्य टक्के
कोकण विभागातून एकूण ३९ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. पैकी ३९ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मात्र, परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. त्यामुळे कोकणचा निकाल कॉपीविरहित तर आहेच, शिवाय एकाही विद्यार्थ्याचा राखीव निकाल नाही, असे गिरी यांनी आवर्जून सांगितले. यावर्षीपासून गायन, संगीत, चित्रकला यांचे सवलती गुण शासनाने एकत्रित केले आहेत.
१०० टक्के निकाल
कोकण विभागात ६२३ माध्यमिक शाळा आहेत. त्यातील २४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३९८ शाळा असून, १३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २१६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के, ४० शाळांचा निकाल ८० ते ९०, १० शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, तर जिल्ह्यातील एकमेव शाळेचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांपैकी १०९ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. १०६ शाळांचा निकाल ९० ते ९९ टक्के इतका लागला. आठ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के, तर २ शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के इतका राहिला आहे.
१00 टक्के गुण
रत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ अशा २७ विद्यार्थ्यांना १00 टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी कला क्षेत्रात काही ना काही केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अधिक गुण मिळाले आहेत.
विशेष गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थी
श्रेणीरत्नागिरीसिंधुदुर्ग
विशेष५,५१८३,९५८
प्रथम९,८८९४,८0८
द्वितीय८,४३३३,0४४
तृतीय२,४२८६३0
प्रमुख विषयांचा निकाल
मराठी विषयाचा ९७.१३ टक्के, इंग्रजी विषयाचा ९६.९३, हिंदी विषयाचा ९७.६३, गणित विषयाचा ९६.१२, विज्ञान शाखेचा निकाल ९७.८४, इतिहास भूगोल विषयाचा निकाल ९८.६७ टक्के इतका लागला आहे.