सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:21 PM2022-06-02T19:21:19+5:302022-06-02T19:21:41+5:30

शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.

Sindhudurg district archeological splendor, more than 35 carvings on Khotle Dhangarwadi road | सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.

मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर 'वेताळा'चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली.

या परिसरात राहणारे लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला 'वेताळ' म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या 'वेताळा'ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.

या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणुन ओळखतात.

अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती लळीत यांनी दिली.

घटना महाराष्ट्रासाठी भूषणावह

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना 'जागतिक वारसा स्थळ' म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव 'युनेस्को' या जागतिक संस्थेकडे पाठवला होता. तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे लळीत यांनी सांगितले.

'लज्जागौरी'सदृश शिल्प आश्चर्यकारक  

खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे 'लज्जागौरी' किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पतीच्या शक्तीमुळे सन्मानाचे स्थान दिले असावे.

Web Title: Sindhudurg district archeological splendor, more than 35 carvings on Khotle Dhangarwadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.