सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 03:38 PM2022-01-17T15:38:49+5:302022-01-17T15:48:45+5:30
सुनावणीत दळवी यांनाच जामीन मंजूर झाला आहे. मात्र राणे व सावंत यांचा जामीन फेटाळला आहे
मुंबई : कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असलेले आणि नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या मनीष दळवींना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना २५ हजाराचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबतची सुनावणी आज झाली. मात्र या प्रकरणात आमदार नितेश राणेंसह गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यासह गोट्या सावंत, दळवी व अन्य संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात राणे, सावंत व दळवी यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तर अन्य संशयितांना अटक झाली होती.
मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी आज ही सुनावणी झाली. या सुनावणीत दळवी यांनाच जामीन मंजूर झाला आहे. मात्र राणे व सावंत यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. मात्र २७ जानेवारी पर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.