Sindhudurg District Bank : अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी लढत, आघाडीकडूनही अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:51 PM2022-01-13T12:51:31+5:302022-01-13T12:54:39+5:30
महाविकासआघाडीकडे बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल. त्यामुळे आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या आज होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेले असतानाच महाविकासआघाडीने सुद्धा अध्यक्ष-उपाध्यक्षासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आयत्यावेळी “ट्वीस्ट” निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाविकासआघाडीकडे बहुमत नाही, असे असतानासुद्धा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डान्टस, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता या निवडणूक प्रक्रियेत चुरस निर्माण होणार आहे. आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपाकडून आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक मनीष दळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांना संधी देण्यात आली आहे. ही नावे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचित केली आहेत. त्यानुसार संबंधित दोघा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यात भाजपचे अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.