सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी पांढरपट्टे उतरले भात लावणीस, बळीराजासाठी एक दिवस उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:51 PM2018-07-07T17:51:33+5:302018-07-07T17:53:48+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.
दरम्यान या उपक्रमाचा जिल्हास्तर शुभारंभ पणदूर येथे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या उपस्थितीत सकाळी पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात उतरत लावणी केली.
पणदूर येथील शेतावर बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमासाठी उपाध्यक्ष रणजित देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. जगताप, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी अध्यक्षा सरोज परब, पणदूर सरपंच दादा साईल, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र आंगणे, सुनिल वारंग, विद्यार्थी, पालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदने विद्यार्थ्यांना शेतीची महती सांगणारा राबविलेला बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. शेतीबद्दलची माहिती व महत्व ज्याला समजले तो खरच खूप भाग्यवान आहे असे मी समजतो. शेतीच्या माध्यमातून मिळणारे यश हे मनाला समाधान देते. शाळेत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर बनणार नाही पण शेतीतून आदर्शवत शेतकरी मात्र नक्की बनतील. भविष्यात शेती शिक्षण तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बालवयातच शेतीचे महत्व रूजायला हवे
रेश्मा सावंत म्हणाल्या, युवा पिढीचा शेतीकडे कल कमी होवू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. बालवयातच शेतीचे महत्त्व रूजायला हवे आणि तसे झाल्यास जिल्ह्यात प्रगत व समृद्ध शेतकरी निर्माण होतील.
विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतात भाजीपाला, भातशेती यासह अन्य पिकांची लागवड केल्यास शेतीविषयक प्रेम निर्माण होऊन या उपक्रमाचा उद्देश सफल होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाचा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शुभारंभ केल्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत शेतात लावणी केली.