डंपरच्या धडकेत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक ठार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 17, 2023 09:09 PM2023-04-17T21:09:52+5:302023-04-17T21:10:00+5:30
ही घटना समजताच जिल्हा बार असोसिएशन तसेच सावंतवाडी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी रुग्णालय परिसरात धाव घेतली होती.
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर झाराप झीरो पॉइंट येथे भरधाव डंपरने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ महिला लिपिक ठार झाली आहे. सुषमा गणपत नेमण ( ५२, मातोंड- पेंडूर) असे तिचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना समजतात वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
याबाबत अधीक माहिती अशी की, नेमण या नेहमीप्रमाणे जिल्हा न्यायालय येथून आपले काम आटोपून आपल्या सहकाऱ्यांसमवेत झाराप झिरो पॉईंट येथे आल्या होत्या. तेथे त्यांना नेण्यासाठी त्यांचा मुलगा येणार होता. यावेळी बांदा येथून कुडाळच्या दिशेने भरधाव येणारा डंपर सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी आला असता. डंपरची नेमण यांना धडक बसली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर तिथेच सोडून पलायन केले. त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना समजताच जिल्हा बार असोसिएशन तसेच सावंतवाडी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी रुग्णालय परिसरात धाव घेतली होती.