सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आता सर्वसामान्यांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 05:44 PM2021-01-28T17:44:20+5:302021-01-28T17:45:35+5:30
hospital Sindhudurg- कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अधिग्रहित केलेले जिल्हा रुग्णालय आता पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले झाले आहे. आता येथे नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अधिग्रहित केलेले जिल्हा रुग्णालय आता पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले झाले आहे. आता येथे नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना सेवेसाठी अधिग्रहित केले होते. त्यामुळे येथे अपघात उपचाराव्यतिरिक्त अन्य सेवा देण्यात येत नव्हती. शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या होत्या. परिणामी जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होत होती.
आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. येथे आता उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वीप्रमाणे जिल्हा रुग्णालयात सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सिटी स्कॅन, डिजिटल एक्सरे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींवर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
केवळ शासकीय शुल्क स्वीकारले जाणार
शासकीय शुल्काशिवाय अन्य शुल्क घेतल्यास संपर्क साधा. जिल्हा रुग्णालयात आता शासकीय शुल्काशिवाय अन्य शुल्क घेतले जाणार नाही. तसेच औषधे बाहेरून घेण्यास सांगितले जाणार नाही. तसा प्रकार घडल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे. त्रुटी, अडचणी असल्यास कळवा. जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सुरू केले आहे. तरीही यात कोणत्या त्रुटी असल्यास किंवा सेवा मिळताना अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे. तसेच जनतेने शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.