सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखडा : पहिल्या टप्प्यात १२५ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:53 PM2018-07-31T14:53:48+5:302018-07-31T14:57:36+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीचा तब्बल १७९ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आराखड्यास कात्री न लावता तो मंजूर केला होता.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील सर्व नियोजन विभागांना मंजूर आराखड्याच्या ७० टक्के निधी वर्ग करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाला १७९ कोटी पैकी १२५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत वर्ग करण्यात येणार आहे.
५४ कोटी रुपये डिसेंबरअखेर मिळणार
शासनाने यावर्षीपासून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन विभागांना मंजूर वार्षिक आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात ७० टक्के निधी वर्ग करण्याचे धोरण अवलंबिले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३० टक्के निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाला पहिल्या टप्प्यात १२५ कोटी निधी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित ५४ कोटी रुपये डिसेंबरअखेर मिळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्याचा आलेख दरवर्षी चढता ठेवलेला आहे.