विकासाची मोठी भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:13 PM2019-03-05T18:13:59+5:302019-03-05T18:14:33+5:30

विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

Sindhudurg district ready to take a big fight for development: Fadnavis | विकासाची मोठी भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज : फडणवीस

विकासाची मोठी भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज : फडणवीस

Next
ठळक मुद्देविकासाची मोठी भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज : फडणवीसकोकणात 22 हजार कोटींचे प्रकल्प हाती

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

आज सकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, आमदार वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. एन. वासुदेवन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याबरोबरच चांदा ते बांदा अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा तसेच विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

विमानतळामुळे विकासाची गती तिप्पट

जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापी जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व माल वाहतुकीची विमान सेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. त्याबाबत ते अभिनंदनास पात्र आहेत.

चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेलअसे ते म्हणाले. आज एअरपोर्ट ॲथॉरेटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सी वर्ल्ड प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना देणारा सी वर्ल्ड प्रकल्प रेंगाळला होता. पण जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ते पुढे म्हणाले भारतातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे होत आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन होण्यास मदत होणार आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी मासेमारी बंदराच्या निर्माणामुळे मत्स्य व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.

कोकणात 22 हजार कोटींचे प्रकल्प हाती

कोकणाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून कोकण विभागात 22 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्गच नैसर्गिक सौंदर्य कायम रहावं यासाठी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक उद्योग या जिल्ह्यात कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नीलक्रांती, सागरमाला या केंद्राच्या योजनांशी सांगड घालत मत्स्यव्यवसाय विभागाने कोकणच्या किनारपट्टीवर विविध विकासकामे सुरू केली आहेत. याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, सिंधुदुर्ग विमानतळ पाहून सर्वांना आभिमान वाटावा अशी या विमानतळाची उभारणी झाली आहे. उडान 3 मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. तथापी या दोन जिल्ह्यातील क्षमतांचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने खास या दोन जिल्ह्यांसाठी उडान 3.1 योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे.

लवकरच सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल अशी ग्वाही देऊन ते म्हणाले, ग्लोबल एव्हीएशन समिट अंतर्गत व्हीजन 2040 या संकल्पनेद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या अंतर्गत विमानांचे सुट्टे भाग निर्मितीचे कारखाने युवक झ्र युवतींना विशेष प्रशिक्षण हे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार निर्मितीस चालना मिळावी यासाठी लवकरच आडाळी, ता. दोडामार्ग येथे औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार असल्याचे सांगून उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, आडाळी औद्योगिक वसाहतीत कृषि उद्योगावर आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असे उद्योगच याठिकाणी उभारले जाणार आहेत. याबाबत नुकतेच गोवा येथे गोवा राज्य तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद घेण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने उद्योजकांनी आडाळी एमआयडीसीसाठी होकार देण्याबरोबरच भूखंड घेण्यासही तत्परता दाखवली आहे. शेवटी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या एकजुटीच्या प्रयत्नाने सुंदर असे विमानतळ सिंधुदुर्गात झाल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य विकासात देशात महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले मत्स्य बिजाची उपलब्धता, बंदरांचा विकास, मत्स्य व्यावसायिकांना आधुनिक साधनांचा पुरवठा यावर भर देण्यात येऊन मत्स्य क्षेत्रात राज्य आघाडीवर नेण्याच संकल्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी सर्वांचे ऋण व्यक्त करुन म्हणाले की, चांदा ते बांदा योजनेमुळे येत्या सहा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. चांदा ते बांदातील कृषि यांत्रिकीकरणामुळे आणि श्री भात लागवड पद्धतीचा वापर केल्याने जिल्ह्याची भात उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढण्यास मदत झाली आहे. या योजनेमुळे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धोत्पादन तसेच काथ्या प्रक्रियामुळे ग्रामिण भागातील महिला तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.

विमानतळासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आतापर्यंत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. याचबरोबर त्यांनी लवकरच म्हणजे येत्या 15 दिवसात विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

सिंधुदुर्ग विमानतळावरून लवकरच प्रवासी वाहतूक सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन खासदार नारायण राणे म्हणाले की, राज्याच्या महसुलात भर टाकण्याची क्षमता सिंधुदुर्ग जिल्ह्यात निश्चितच आहे. आनंदवाडी बंदराचे देखील लवकरात लवकर काम पूर्ण करून मत्स्यव्यावसायिकांना शासनाने दिलासा द्यावा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा ही योजना क्रांतीकारी ठरल्याचे सांगून खासदार विनायक राऊत म्हणाले की, उडान योजनेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश झाल्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या किंमतीत विमान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांदा ते बांदा योजनेची यशस्वीता पाहता रत्नागिरी जिल्ह्याचाही या योजनेत समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

या समारंभात उभादांडा, ता. वेंगुर्ला येथील मत्स्यबीज केंद्राचे भूमिपूजन, आनंदवाडी, ता. देवगड येथील मासेमारी बंदराचे भूमिपूजन, सिंधुदुर्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मालकी घराचे वाटप, सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या सी.सी.टी.व्ही प्रकल्पाचे लोकार्पण, देवगड पवनचक्कीचे लोकार्पण, चांदा ते बांदा अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन व शेळीपालन योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप, चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत कृषि औजारांचे वाटप, चांदा ते बांदा अंतर्गत बंधाऱ्यांचे भूमिपूजन, श्री पद्धतीने भाताची लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार, श्रमयोगी मानधन योजना लाभार्थ्यांना कार्डचे वाटप, पीएम-किसान योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, आयुष्यमान भारत योजनांचे प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

हा समारंभ संपन्न झाल्यावर गुजरात राज्यातील वस्त्राल येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असंघटीत कामगारांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम स्थळी मोठ्या पडद्यावर करण्यात आले. या भाषणाचा उपस्थित मान्यवर व नागरिकांनी लाभ घेतला.

या समारंभास माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, अजित गोगटे, पुष्पसेन सावंत यांच्यासह अतुल काळसेकर, संदेश पारकर, मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू, दिपाली म्हैसकर, सुधाताई म्हैसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम तसेच चिपी व परुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधु झ्र भगिनी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg district ready to take a big fight for development: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.