सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये : परशुराम उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 17:06 IST2021-05-26T16:49:15+5:302021-05-26T17:06:13+5:30
CoronaVIrus Sindudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.

सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये : परशुराम उपरकर
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयातील नर्सेसच्या आंदोलनामुळे वास्तव जनतेसमोर आले आहे. मागण्यांसाठी नर्सेसना कोरोना कालावधीत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैव आहे. आता यापुढे कोरोना रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांचा पुढाकार आवश्यक आहे, तरच या आजारावर नियंत्रण मिळविता येईल. जिल्ह्यातील ज्या लोकांनी खासदार, आमदारांना निवडून दिले, ते लोक कोरोनामुळे त्रस्त झाले असताना, त्यांची काळजी घ्यायला कोणीच नसल्याची सध्याची स्थिती आहे.
जिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडलेली
जिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडली आहे. पीएम केअर योजनेमधून मिळालेले व्हेंटिलेटर अद्याप जोडलेले नाहीत; तर पालकमंत्र्यांच्या घोषणा प्रत्यक्षात उतरत नाहीत. त्यांनी जिल्ह्यासाठी अद्याप शववहिनी दिलेली नाही, रुग्णवाहिका दिल्या, पण त्यासाठी चालक नाहीत.
रॅपिड टेस्ट वाढवल्याने रुग्ण मिळत आहेत, पण त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात जनतेसाठी सेवा देण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक तिथेच राहत आहेत. ते तिथेच झोपतात आणि मग घरी जातात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे.
नागेश पवार यांची बदली रद्द करावी
डॉ. नागेश पवार यांची बदली रद्द करावी. त्यांना जिल्ह्यात काम करायचे असून, पालकमंत्र्यांनी त्यांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. नर्सना त्रास देत असलेले डॉक्टर पालकमंत्र्यांनी बोलावूनदेखील बैठकीत उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे कोणाचाच वचक राहिलेला नाही. मेडिकल कॉलेजसाठी मंजूर असलेले ५०० डॉक्टर, कर्मचारी तत्काळ भरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.